पाडापाडी केली, मूलभूत सोयीसुविधांचे जाळे कसे हलवणार? मनपाला मोठ्या प्रमाणात निधी लागणार
By मुजीब देवणीकर | Updated: August 4, 2025 15:25 IST2025-08-04T15:15:32+5:302025-08-04T15:25:01+5:30
रस्त्यांचे डीपीआर करण्यास सुरूवात केल्याचेही नमूद केले. मात्र, २०० मीटर रस्त्यात येणाऱ्या मूलभूत सोयीसुविधांचे जाळे कसे बाजूला करणार, हे सांगितले नाही.

पाडापाडी केली, मूलभूत सोयीसुविधांचे जाळे कसे हलवणार? मनपाला मोठ्या प्रमाणात निधी लागणार
छत्रपती संभाजीनगर : महापालिकेने शहरातील प्रमुख रस्ते २०० फूट रुंद व्हावेत, यासाठी तब्बल ५ हजार अनधिकृत मालमत्ता मागील महिन्यात जमीनदोस्त केल्या. पाडापाडीनंतर रस्ते करण्यासाठी मनपाने पेडेको या खासगी संस्थेला डीपीआर तयार करण्यास सांगितले. संस्थेने कामही सुरू केले. तत्पूर्वी महापालिकेला भूसंपादन करावे लागेल. रस्त्यात जलवाहिन्या, ड्रेनेज लाईनचे जाळे, गॅसची लाईन, पथदिवे, महावितरणचे विद्युत खांब, ११ केव्हीच्या अंडरग्राऊंड केबल हलविण्याचे मोठे आव्हान आहे. या कामांसाठी पैसाही भरपूर लागेल. तूर्त मनपाच्या अजेंड्यावर हा विषय नाही, हे विशेष.
शहरातील मुख्य रस्ते रुंद असावेत, यावर कोणाचेही दुमत नाही. मनपाने घेतलेल्या रस्ता रुंदीकरण मोहिमेला सर्वच स्तरातून पाठिंबा मिळाला. ४ जून ते ११ जुलैपर्यंत महापालिकेने ६० मीटर रुंद रस्ते मोकळे केले. यावेळी पाडण्यात आलेल्या सर्वच मालमत्ता अनधिकृत ठरविण्यात आल्या. त्यामुळे मालमत्ताधारकही निरूत्तर झाले. रुंदीकरणात बाधित होणारी जागा तर मालमत्ताधारकांच्या मालकीची आहे. त्याचे भूसंपादन मनपाला करावेच लागणार आहे. प्रशासक जी. श्रीकांत यांनी दोन दिवसांपूर्वी यावर आपली भूमिकाही मांडली. रस्त्यांचे डीपीआर करण्यास सुरूवात केल्याचेही नमूद केले. मात्र, २०० मीटर रस्त्यात येणाऱ्या मूलभूत सोयीसुविधांचे जाळे कसे बाजूला करणार, हे सांगितले नाही. जवळपास ५० किमी अंतरातील जलवाहिन्या, ड्रेनेज लाईन, गॅसच्या अलीकडेच टाकलेल्या लाईन, पथदिवे, महावितरणचे विद्युत खांब, महावितरणच्या ११ केव्ही क्षमतेच्या केबल कशा हलवणार, हा मोठा प्रश्न आहे.
सोयीसुविधा बंद कशा ठेवणार?
जलवाहिनी शिफ्ट करताना ती किती दिवस बंद ठेवणार? ड्रेनेज लाईन तर बंद ठेवताच येत नाही. विद्युत खांबासाठीही अगोदर पर्यायी व्यवस्था करावी लागते. त्यानंतर शिफ्टिंग होते. ११ केव्ही क्षमतेच्या केबलसुद्धा एक दिवसही बंद ठेवता येत नाहीत. पर्यायी व्यवस्था किंवा उपाययोजना केल्याशिवाय अशा सुविधांचे स्थलांतर करताच येत नाही.
सर्वेक्षण सुरू, अहवाल आल्यावर निर्णय
पेडेको संस्थेमार्फत मूलभूत सोयीसुविधांबाबत सर्वेक्षण सुरू आहे. महिनाभरात त्यांचा अहवाल येईल. मनपाकडून ड्रेनेज, जलवाहिन्या टाकण्याची कामे सुरू आहेत. त्या अंतर्गत ही कामे होतील. पथदिवे, विद्युत खांब, केबल या संदर्भातही स्वतंत्र निर्णय घेतला जाईल.
६० मीटर रुंद रस्त्यांची लांबी रस्ता--------------------------अंतर किमी-------दोन्ही बाजूंची लांबी
मुकुंदवाडी ते केम्ब्रिज--------६------------------१२
महानुभाव आश्रम ते बंबाटनगर--८------------------१६
महानुभाव आश्रम ते गेवराई--- ५.९---------------१२
पडेगाव ते दौलताबाद टी पॉईंट---६.३-------------१२
वसंतराव नाईक चौक ते हर्सूल तलाव---७.०----------१४