डॉक्टर कसा होणार, वर्गच होत नाहीत; शिक्षकांच्या संपामुळे १५०० वर विद्यार्थ्यांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2022 23:59 IST2022-03-08T23:59:00+5:302022-03-08T23:59:00+5:30
वैद्यकीय शिक्षक संघटनेतर्फे विविध मागण्यांसाठी आंदोलन करण्यात येत आहे.

डॉक्टर कसा होणार, वर्गच होत नाहीत; शिक्षकांच्या संपामुळे १५०० वर विद्यार्थ्यांचे नुकसान
औरंगाबाद : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (घाटी)वैद्यकीय शिक्षक संघटनेने विविध प्रलंबित मागण्यांसाठी शैक्षणिक व प्रशासकीय कामांवर बहिष्कार टाकला आहे. याचा प्रशासकीय कामांसोबतच विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होत आहे. महिन्याभरापासून एकही वर्ग झालेला नसल्याने १५०० वर विद्यार्थ्याचे शैक्षणिक नूकसान होत आहे.
वैद्यकीय शिक्षक संघटनेतर्फे विविध मागण्यांसाठी आंदोलन करण्यात येत आहे . शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, तसेच शासकीय कर्करोग रुग्णालयातील जवळपास ५०० वैद्यकीय शिक्षक पलया आंदोलनात सहभागी आहेत. त्यांनी प्रशासकीय व शैक्षणिक कामांवर बहिष्कार टाकला आहे. जोपर्यंत शासनाकडून मागण्यापुर्ण होत नाही. तोपर्यत माघार नाही. अशी भूमिका वैद्यकीय शिक्षक संघटनेने घेतली आहे. त्यामुळे घाटीत एमबीबीएस अभ्यासक्रमासाठी प्रवेश होऊन महिना होत आला तरी अद्याप एकदाही वर्ग झालेला नाही.
वैद्यकीय शिक्षकांच्या आंदोलनामुळे एमबीबीएस प्रथम वर्षाचे वर्ग नियोजनानुसार सुरू झाले नाही आणि त्यांचा स्वागत सोहळाही झाला नाही. हा स्वागत सोहळा दरवर्षी प्रमाणे होणार होता, परंतु तो पुढे ढकलण्याची वेळ ओढवली.
-विद्यार्थी संख्या: एमबीबीएस-६००, बीपीएमटी-३००, डिएमएलटी-६०, पीजी-५००
मागण्या पूर्ण होण्यासारख्या
शासन सहजपणे पूर्ण करू शकतील, आशा मागण्यांसाठी आंदोलन सुरु आहे. वैद्यकीय विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नूकसान होत असल्याने शासनाने आमच्या मागण्या तातडीने मान्य कराव्यात.
- डॉ. भारत सोनवणे, अध्यक्ष, वैद्यकीय शिक्षक संघटना