मजुरी सोडून कशी येणार ? ७२ वर्षीय आदिवासी महिलेने पहिल्यांदाच पाहिले तालुक्याचे गाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2022 19:32 IST2022-01-05T19:32:19+5:302022-01-05T19:32:51+5:30
तहसील कार्यालयातून उत्पन्नाचे प्रमाणपत्र घेण्यासाठी गाठले तालुक्याचे गाव

मजुरी सोडून कशी येणार ? ७२ वर्षीय आदिवासी महिलेने पहिल्यांदाच पाहिले तालुक्याचे गाव
सोयगाव ( औरंगाबाद ) : जगप्रसिद्ध अजिंठा लेणी पहिले नाही, विमानात प्रवास केला नाही किंवा विदेशात गेलेले नाही यावर विश्वास ठेवू शकतो परंतु अवघ्या ४५ किमीवर असलेले आपले तालुक्याचे गाव सोयगाव पाहिले नाही असे कोणी सांगितले तर त्यावर कोणाचाही विश्वास नाही बसणार. मात्र, काळदरी गावातील एका ७२ वर्षीय आदिवासी आजीने मंगळवारी पहिल्यांदाच सोयगाव पाहिले. कारण ठरले तहसील कार्यालयातून उत्पन्न प्रमाणपत्राचे.
सोयगाव पासून ४५ कि.मी असलेल्या आदिवासी काळदरी गावातील यनुबाई गोपीनाथ मधे ( ७२ ) या आदिवासी महिलेने मंगळवारी पहिल्यांदाच तालुक्याचे गाव पाहिले, अशी प्रतिक्रिया दिली आणि सारेच आश्चर्यचकित झाले. तुम्ही अद्यापही सोयगावला का आल्या नाहीत ? याबाबत विचारणा केली असता, मजुरीने सोडून कसे येणार, तसेच शासनाच्या योजनांची माहितीच नव्हती असे उत्तर दिले. शिवाय आदिवासी गाव काळदरी येथून सोयगावला येण्यासाठी एसटी बसच नाही, त्यामुळे इथे येण्याचा योग कधी जुळलाच नाही असेही त्यांनी प्राणजळपणे सांगितलं.
यनूबाई यांना आता गावातील कोणीतरी संजय गांधी निराधार योजनेबद्ल माहिती दिली. सरकार निराधारांना मदत करते,असे कळल्यानंतर त्यांनी कागदपत्राची जुळवाजुळव सुरु केली. तेव्हा तालुक्याच्या तहसील कार्यालयातून उत्पन्नाचे प्रमाणपत्र काढावे लागते हे त्यांना कळले. यासाठी मंगळवारी त्या गावातील इतर महिलांसोबत सोयागावला आल्या.
कार्यालयात येताच झाल्या कावऱ्याबावऱ्या
सोयगावच्या तहसील कार्यालयात प्रवेश करताच यनूबाई यांना सगळे नवेच दिसत होते. त्या कार्यालयातील प्रत्येक ठिकाण, टेबल न्याहाळून पाहत. मास्क नसल्याने त्यांनी पदर तोंडाला बांधला होता. एक ७२ वर्षीय आजी पहिल्यांदाच तहसील कार्यालयात आल्याची माहिती मिळताच तहसीलदार रमेश जसवंत यांनी त्यांना तत्काळ उत्पन्नाचे प्रमाणपत्र देण्याच्या सूचना केल्या. काम लवकर झाल्याने सर्वांचे आभार त्यांनी गावाकडची वाट धरली.
लागलीच प्रमाणपत्र दिले
काळदरी येथून काही महिला ग्रामस्थांसोबत कार्यालयात आल्याची माहिती मिळाली. त्यांच्यासोबत आलेल्या एका ७२ वर्षीय महिलेने पहिल्यांदाच सोयगाव आणि तहसील कार्यालयात पाऊल टाकल्याचे समजताच त्यांना तत्काळ प्रमाणपत्र देण्याच्या सूचना केल्या.
- रमेश जसवंत, तहसीलदार