वातावरण कसे? औरंगजेबाच्या कबरीवरून उठलेल्या वादंगाने पर्यटनाला फटका बसण्याची भीती
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2025 20:01 IST2025-03-20T20:00:53+5:302025-03-20T20:01:47+5:30
गेल्या काही दिवसांपासून औरंगजेबाच्या कबरीवरून तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. अशा परिस्थितीत पर्यटक सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून विचार करू लागले आहेत.

वातावरण कसे? औरंगजेबाच्या कबरीवरून उठलेल्या वादंगाने पर्यटनाला फटका बसण्याची भीती
छत्रपती संभाजीनगर : औरंगजेबाच्या कबरीवरून उठलेल्या वादंगाने जिल्ह्यातील पर्यटनाला फटका बसण्याची भीती व्यक्त होत आहे. ‘वेरुळ, अजिंठा लेणी पाहण्यासाठी यायचे आहे, पण सध्या वातावरण कसे आहे ? पर्यटनासाठी यावे की नाही ?’ अशी विचारणा पर्यटकांकडून जिल्ह्यातील टूर व्यावसायिक, गाईड्स यांना होत आहे.
नागपूरच्या तणावानंतर राज्यभरात अर्लट घोषित करण्यात आला आहे. छत्रपती संभाजीनगर हे राज्याची पर्यटन राजधानी आहे. जगप्रसिद्ध अजिंठा आणि वेरूळ (एलोरा) लेणी, बीबी का मकबरा, देवगिरी किल्ला यासारखी ऐतिहासिक ठिकाणे आहेत. या ठिकाणांना दरवर्षी लाखो देशी-विदेशी पर्यटक भेट देतात. मात्र, गेल्या काही दिवसांपासून औरंगजेबाच्या कबरीवरून तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. अशा परिस्थितीत पर्यटक सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून विचार करू लागले आहेत. जिल्ह्यातील वातावरण कसे आहे, पुढे परिस्थिती कशी राहील, पर्यटनासाठी यावे की, अन्य स्थळांकडे जावे, अशी विचारणा पर्यटकांकडून टूर व्यावसायिकांना होऊ लागली आहे. त्यामुळे सध्या वातावरण निवळले नाही तर पर्यटनाला फटका बसण्याची चिंता व्यक्त होत आहे. विशेषत: खुलताबाद, वेरुळ लेणी, देवगिरी किल्ला येथील स्थानिक रोजगार आणि उत्पन्नावर थेट परिणाम होण्याची भीती आहे.
...तर परिणाम होईल
सध्या पर्यटनस्थळांवर फारसा परिणाम झालेला नाही. मात्र, मुंबई, पुण्याहून येणाऱ्या पर्यटकांकडून शहरातील वातावरणाविषयी विचारणा होत आहे. अधिक दिवस असेच वातावरण राहिले तर पर्यटनावर त्याचा परिणाम होऊ शकतो.
- भरत जोशी, गाईड, वेरूळ
चिंतादायक स्थिती
औरंगजेबच्या कबरीवरून निर्माण झालेल्या वातावरणाने एजंट्सना शहराच्या स्थिरतेबद्दल विचारणा सुरू झाली आहे. मात्र, आतापर्यंत कोणतेही टूर रद्द झालेले नाही. परंतु, चिंता निश्चितच आहे. सुदैवाने आपण हंगामाच्या शेवटी येत आहोत.
- जसवंतसिंग, अध्यक्ष, औरंगाबाद टुरिझम डेव्हल्पमेंट फाउंडेशन (एटीडीएफ)
‘ग्रोक’ही म्हणाला, पर्यटनाला बसेल फटका
इलाॅन मस्कची आर्टिफिशियल इंटेलिजेन्स कंपनी ‘एक्स एआय’चा चॅटबाॅट ‘ग्रोक’ एआय सध्या चर्चेत आहे. या ‘ग्रोक’ला ‘औरंगजेबची कबर काढण्याच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनामुळे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पर्यटनास फटका बसेल काय ?’ अशी विचारणा केली. तेव्हा ‘होय’ असे उत्तर देत ‘ग्रोक’ने पर्यटनाला अल्पकालीन आणि कदाचित दीर्घकालीन नुकसान सहन करावे लागू शकते, असे सांगितले. त्याबरोबर कोणकोणत्या क्षेत्रावर त्याचा परिणाम होईल, याची मांडणी केली.