मुले कशी आहेत, व्हिडिओ काॅल लावा; अपघातात असह्य वेदनेतही आईला मुलाबाळांची चिंता
By संतोष हिरेमठ | Updated: October 16, 2023 14:21 IST2023-10-16T14:20:39+5:302023-10-16T14:21:06+5:30
हा प्रवास जीवावर उठेल, असे वाटले नव्हते

मुले कशी आहेत, व्हिडिओ काॅल लावा; अपघातात असह्य वेदनेतही आईला मुलाबाळांची चिंता
छत्रपती संभाजीनगर : एका ठिकाणी जेवण करून गाडीत बसलो आणि काही मिनिटांतच झोप लागली. पण, अचानक काय घडले कळलेच नाही आणि जेव्हा डोळे उघडले तेव्हा रुग्णालयात होतो. हा प्रवास जीवावर उठेल, असे वाटले नव्हते, अशा शब्दांत समृद्धी महामार्गावरील भीषण अपघातात जखमींनी आपली भावना व्यक्त केली. ‘मुले कशी आहेत, व्हिडिओ काॅल लावा...’ अशी विनंतीही जखमी नातेवाइकांकडे करीत होते.
पती गाडी चालवीत होते
एका ठिकाणी जेवणासाठी थांबलो होतो. जेवणानंतर गाडीत बसलो. पती संदीप अस्वले (टेम्पो ट्रॅव्हलर) हे गाडी चालवीत होते. मी पाठीमागे बसले होते. अचानक पाठीमागून कोणीतरी जोरदार धडक दिल्याचे जाणवले. त्यानंतर रुग्णालयातच जाग आली. माझ्या डोक्याला खूप मारला लागला आहे.
-पूजा अस्वले, जखमी
काही आठवेना
नेमके काय झाले, हे काही कळलेच नाही. काही आठवतच नाही, असे संदीप अस्वले म्हणाले. अपघाताचा त्याचा मोठा धक्का बसला. त्यांच्या डोक्याला, नाकाला दुखापत झाली आहे.
- संदीप अस्वले
नशिबाचा भाग
परतीचा प्रवास सुरू असताना अचानक अपघात झाला. हा सगळा नशिबाचा भाग आहे. सोबत पत्नी, मुलेही होते.
- लखन साळवे, जखमी
झोपेत काही कळेलच नाही
झोपेत होतो. नेमके काय झाले, कसे झाले, हे काही कळलेच नाही. अपघातात मोबाईल कुठेतरी पडला. त्यामुळे घाटीत दाखल झाल्यानंतर कुटुंबीयांशी संपर्कही साधता आला नाही.
-अनिल साबळे, जखमी