५० खाटा असलेल्या रुग्णालयांनीही स्वत:चे ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प करावेत :जिल्हाधिकारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 19:37 IST2021-04-21T19:35:57+5:302021-04-21T19:37:08+5:30
राज्य शासनाकडे जिल्हयाला लागणाऱ्या ऑक्सिजन साठ्याची मागणी करावयाची आहे, त्यासाठी सर्व रुग्णालयांनी त्यांना आवश्यक असलेल्या ऑक्सिजनची मागणी जिल्हा प्रशासनास तत्परतेने सादर करावी.

५० खाटा असलेल्या रुग्णालयांनीही स्वत:चे ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प करावेत :जिल्हाधिकारी
औरंगाबाद : कोविडच्या वाढत्या संसर्गात ऑक्सिजनची उपलब्धता कायम ठेवण्याच्यादृष्टीने ५० खाटा असलेल्या रुग्णालयांनीही स्वत:चे ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प सुरू करावेत, असा सल्ला जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी मंगळवारी येथे खासगी रुग्णालयांच्या प्रतिनिधींसमवेत आयोजित बैठकीत दिला. रुग्णालयांनी स्वत:चे ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प तातडीने उभे करावेत तसेच सध्या आवश्यक तेवढ्याच ऑक्सिजनची मागणी करावी, जेणेकरून भविष्यात वाढीव रुग्णसंख्येच्या प्रमाणात लागणाऱ्या ऑक्सिजनचा पुरवठा रुग्णांना उपलब्ध करून देणे शक्य होईल, असे ते म्हणाले.
खासगी रुग्णालयांमधील ऑक्सिजन, रेमडेसिविर इंजेक्शन वापराबाबतच्या आढावा बैठकीत जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी डॉ. अनंत गव्हाणे, उपजिल्हाधिकारी मंदार वैद्य, रिता मेत्रेवार, आप्पासाहेब शिंदे, संगीता चव्हाण यांच्यासह खासगी रुग्णालयांचे वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते. चव्हाण यांनी सांगितले की, कोरोना रुग्णसंख्येचा वाढता आलेख लक्षात घेऊन आणि आता इतर राज्यातही कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर आवश्यक प्रमाणात ऑक्सिजन साठा इतर राज्यांकडून मिळण्यास अडचण येऊ शकते. त्यादृष्टीने रुग्णालयांनी हवेतून ऑक्सिजन वेगळा करून साठा करण्याची क्षमता वाढवण्याची, त्यादृष्टीने ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प सुरू करण्याची गरज आहे. सिग्मा, माणिक, लाइफलाइन या रुग्णालयांप्रमाणे इतर रुग्णालयांनीही तातडीने ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प सुरू करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी यांनी यावेळी दिले.
राज्य शासनाकडे जिल्हयाला लागणाऱ्या ऑक्सिजन साठ्याची मागणी करावयाची आहे, त्यासाठी सर्व रुग्णालयांनी त्यांना आवश्यक असलेल्या ऑक्सिजनची मागणी जिल्हा प्रशासनास तत्परतेने सादर करावी. गरजेइतकीच आणि वस्तुनिष्ठ मागणी नोंदवण्यास रुग्णालयांनी प्राधान्य द्यावे, असे सूचित करून जिल्हाधिकारी यांनी रेमडेसिविर इंजेक्शनचा साठाही मर्यादित असून मागणी जास्त आहे. त्या पार्श्वभूमीवर शासनाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणेच कटाक्षाने रेमडेसिविर, ऑक्सिजन वापर करण्याची सर्वांनी खबरदारी घ्यावी. तसेच कोविड उपचारासाठी शासन दरानेच देयके आकारावीत. अतिरिक्त शुल्क घेऊ नये, अन्यथा अशा वाढीव देयकांची प्रशासनामार्फत चौकशी करून अतिरिक्त आकारलेले पैसे रुग्णास परत करावे लागतील, असे स्पष्ट केले. धूत रुग्णालय, कमलनयन बजाज रुग्णालय, श्रध्दा रुग्णालय, अजंता रुग्णालय, एमजीएम रुग्णालय, ओरीयन सिटी रुग्णालय, एम्स रुग्णालय, जे जे प्लस रुग्णालयासह इतर खासगी रुग्णालयांचे वैद्यकीय अधिकारी, डॉक्टर्स बैठकीस उपस्थित होते..