गौरवास्पद! कुलगुरू विजय फुलारी यांना संरक्षण मंत्रालयाकडून ‘कर्नल कमांडंट’ पदवी जाहीर
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2025 13:29 IST2025-04-02T13:27:49+5:302025-04-02T13:29:27+5:30
संरक्षण मंत्रालय अंतर्गत राष्ट्रीय छात्र सेनेतर्फे (एनसीसी) देण्यात येणाऱ्या या सन्मानासाठी महाराष्ट्रातून दोन विद्यापीठांच्या कुलगुरुंचा समावेश आहे.

गौरवास्पद! कुलगुरू विजय फुलारी यांना संरक्षण मंत्रालयाकडून ‘कर्नल कमांडंट’ पदवी जाहीर
छत्रपती संभाजीनगर : केंद्रीय संरक्षण मंत्रालयातर्फे देशातील १३ विद्यापीठांच्या कुलगुरुंना ‘कर्नल कमांडंट’ पदवी जाहीर केली आहे. त्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विजय फुलारी यांना हा सन्मान घोषित जाहीर झाला आहे.
संरक्षण मंत्रालयाने राजपत्र नुकतेच प्रकाशित केले आहे. या राजपत्रात देशातील १३ विद्यापीठांच्या कुलगुरुंना ‘मानद कर्नल’ पदवी घोषित केली. संरक्षण मंत्रालय अंतर्गत राष्ट्रीय छात्र सेनेतर्फे (एनसीसी) देण्यात येणाऱ्या या सन्मानासाठी महाराष्ट्रातून दोन विद्यापीठांच्या कुलगुरुंचा समावेश आहे. या राजपत्रात ब्रिगेडियर संजीव कोहली यांनी घोषित केले आहे की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विजय फुलारी यांना ’कर्नल कमांडंट’ पदवी प्रदान करण्यात येत आहे. त्याशिवाय दापोली येथील डॉ. बाबासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय भावे यांचाही समावेश आहे.
डॉ. फुलारी हे २४ जून २०२४ पासून कुलगुरूपदी कार्यरत आहेत. गेल्या सव्वा वर्षाच्या काळात 'नॅक' फेर मूल्यांकनात ‘ए प्लस’ मानांकन, ‘एनआयआरएफ’मध्ये टॉप ५० विद्यापीठात स्थान, पीएम उषा अंतर्गत १०० कोटींचा निधी यासह अनेक महत्त्वपूर्ण उपलब्धी या काळात प्राप्त करून दिल्या आहेत.