घरकामगारांचा मोर्चा
By Admin | Updated: July 5, 2014 00:34 IST2014-07-04T23:35:26+5:302014-07-05T00:34:31+5:30
परभणी : घरकामगारांना प्राधान्यक्रमाने अन्नसुरक्षा योजनेचा लाभ द्यावा, यासह अन्य मागण्यांसाठी शुक्रवारी घरकामगारांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा नेला.
घरकामगारांचा मोर्चा
परभणी : घरकामगारांना प्राधान्यक्रमाने अन्नसुरक्षा योजनेचा लाभ द्यावा, यासह अन्य मागण्यांसाठी शुक्रवारी घरकामगारांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा नेला.
उद्धव शिंदे, भगवान जामकर, कौसाबाई साखरे यांनी या मोर्चाचे नेतृत्व केले. आंतरराष्ट्रीय संघटनेत मंजूर केलेल्या ठरावानुसार भारत सरकार आणि महाराष्ट्र सरकारने घरकामगारांसाठी समग्र कायदा करुन त्यांना किमान वेतन, प्रोव्हीडंट फंड, ग्रॅज्युएटी, साप्ताहीक सुटी, बाळंतपणाची रजा, अपघात नुकसान भरपाई आदींचे संरक्षण द्यावे, ५० ते ५५ वर्षे वयोगटातील घरकामगारांना कायमस्वरुपी दरवर्षी सन्मानधन द्यावे, ६० वर्षावरील घर कामगारांना सामाजिक न्याय विभागाच्या श्रावणबाळ आणि तत्सम योजनेचा लाभ द्यावा, जनश्री विमा योजनेचे सर्व लाभ नोंदणीकृत घरकामगारांना नोंदणीच्या तारखेपासून द्यावेत, १४ वर्षे वयावरील सर्व घरकामगारांची नोंदणी करुन घ्यावी, महाराष्ट्र शासनाने जाहीर केल्याप्रमाणे घरकामगारांच्या पाल्याला लॅपटॉप, टॅबलेट व शिक्षणासाठी अर्थसहाय्य द्यावे आदी मागण्या या मोर्चाच्या माध्यमातून मांडण्यात आल्या. महाराष्ट्र राज्य सर्व श्रमिक महासंघाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा नेण्यात आला. यशस्वीतेसाठी शबाना बेगम, रुख्मिणबाई गवळी, बेबीताई वाकोडे, गंगाबाई नवघरे, मंगल महाजन, सुशीलाबाई शहाणे, भारतीबाई स्वामी, ज्योतीबाई हानेगावकर, आशाबाई सोनवळकर, रुख्मिणबाई भाकरे, संगीता घिके, सुवर्णा रामपूरकर, मीना नागलवार, गोदावरी नागलवार, डिंपल ठाकूर, साजेदा बेगम, तस्लीम बेगम, सरस्वती जनकवार, गोकर्णाबाई कंठाळे, प्रतिभा बलसेटवार, गंगासागर ठाकरे, सिंधुताई कानडे, आशाबाई घोडके, सीताबाई लोखंडे आदींनी परिश्रम घेतले. (प्रतिनिधी)
घोषणांनी परिसर दणाणला
घरकामगारांंनी परभणी शहरातील शनिवार बाजार येथून आपल्या विविध मागण्यांसाठी मोर्चा काढला. यामुळे वाहतुकीची कोंडी झाली होती. तसेच महिला कामगारांच्या घोषणाबाजीने परिसर दणाणून गेला.
घरकामगारांनी आपल्या विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिले.