वारसा ऐतिहासिक पण पाण्याची बोंबाबोंब; निपट निरंजन कॉलनीसह १८ वसाहतींची टँकरवरच मदार
By साहेबराव हिवराळे | Updated: April 2, 2024 18:57 IST2024-04-02T18:56:13+5:302024-04-02T18:57:03+5:30
न्यू पहाडसिंगपुरा, निपट निरंजन कॉलनी, पार्वतीनगरासह इतर १६ वसाहतींची टँकरवरच मदार एक दिवस एक वसाहत

वारसा ऐतिहासिक पण पाण्याची बोंबाबोंब; निपट निरंजन कॉलनीसह १८ वसाहतींची टँकरवरच मदार
छत्रपती संभाजीनगर : ऐतिहासिक वारसास्थळे जवळ असलेल्या न्यू पहाडसिंगपुरा, निपट निरंजन कॉलनी, नर्सेस कॉलनी, खुशबू कॉलनी, पार्वतीनगरसह इतर १६ वसाहतींची तहान टँकरवरच भागते. या परिसरात शैक्षणिक संस्थाही आहेत. परिसरातील रहिवाशांना सोयीच्यावेळी पुरेसा पाणीपुरवठा करणे अपेक्षित आहे. कचरा सफाई करणारे या भागातील विविध कॉलन्यांत फिरकतदेखील नाहीत. घंटागाडी येते; पण ती घरापर्यंत नव्हे तर कॉर्नरवरूनच माघारी जाते. मग कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी ड्युटीवर जाताना हातात कचरा घेऊन घंटागाडीमागे फिरावे लागत असल्याचे स्थानिकांनी सांगितले.
अपुऱ्या पाणीपुरवठ्यामुळे टँकर घ्यावेच लागते
पाण्याचे दुर्भिक्ष्य न्यू पहाडसिंगपुरा, पार्वतीनगरसह इतर १६ वसाहतींना आहे. नवीन पाणीपुरवठा योजनेची टाकी बांधली. मात्र, पुरेशा पाण्यासाठी प्रतीक्षाच असून, सध्या तरी जार आणि टँकरवरच मदार ठेवावी लागत आहे.
- ॲड. हेमलता वाघमारे (रहिवासी)
कचरा गाडी आठवड्याला
काही निवडक वसाहतीत घंटागाडी फक्त चौक व कॉर्नरवरून येऊन निघून जाते. तिचा पाठलाग करावा लागते. हातात कचरा घेऊन तिचा शोध घेण्याची वेळ अनेकदा परिसरातील महिला व नागरिकांवर येते.
- दीपक जाधव (रहिवासी)
अतिक्रमणाकडे मनपाचे दुर्लक्ष
खेळाचे मैदान अतिक्रमणांत हरवले असून, कॉलनीत जातानाही वाहने चालविताना अत्यंत दक्षपणे ये-जा करावी लागते.
- प्रमोद सावंत
ड्रेनेजलाईनला योग्य उतार हवा
कचरा सफाई होत नसल्याने रस्त्याच्या बाजूला अघोषित कचरा डेपो तयार होतो. परिसराचे भौगोलिक क्षेत्र चढउताराचे असल्याने मलनिस्सारण वाहिनीची समतल पातळी असणे गरजेचे आहे. मग ड्रेनेज चोकअपच्या तक्रारी कमी होतील.
- संतोष भिंगारे