एमआयएमची विधानसभेसाठी महाविकास आघाडीला साद; राज्यातील ३० जागांवर चाचपणीही सुरू
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2024 18:22 IST2024-08-14T18:21:19+5:302024-08-14T18:22:59+5:30
एमआयएमला सोबत घेतल्यास महाविकास आघाडीचा फायदाच, इम्तियाज जलील यांचे आवाहन

एमआयएमची विधानसभेसाठी महाविकास आघाडीला साद; राज्यातील ३० जागांवर चाचपणीही सुरू
छत्रपती संभाजीनगर : लोकसभेची लाट विधानसभेतही राहील, या भ्रमात शरद पवार, उद्धव ठाकरेंनी राहू नये. एमआयएम पक्षाला सोबत घेतल्यास त्यांना फायदाच होईल, अन्यथा नंतर पराभव झाल्यास आम्हाला जबाबदार धरू नका, असे सांगत माजी खासदार इम्तियाज जलील यांनी एमआयएम पक्ष महाविकास आघाडीसोबत जाण्यास तयार असल्याचे बुधवारी स्पष्ट केले.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जलील यांनी पत्रकार परिषदेत भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, माझा लोकसभेतला पराभव हा जरांगे फॅक्टरमुळे झाला. एकटा लढूनही मी दुसऱ्या क्रमांकावर राहिलो, यातच पक्षाचे जिल्ह्यातील महत्व स्पष्ट होते. शरद पवार यांची अद्याप मी भेट घेतलेली नाही. मात्र, महाविकास आघाडीसोबत एमआयएम विधानसभा निवडणूक लढण्यास तयार आहे. आम्ही अनावश्यक मागण्या करणार नाही. आघाडीच्या नेत्यांनी एमआयएमचे महत्व ओळखून सहभागी करून घ्यावे. मी चर्चेसाठी कधीही यायला तयार आहे. पण नकार दिल्यास नंतरच्या पराभवाला आम्हाला जबाबदार धरू नका, असा इशारा देखील त्यांनी दिला. शिवाय, २९ ऑगस्ट रोजी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पुढील आराखडा निश्चित करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
३० जागांसाठी चाचपणी
शहरातील मध्य, पूर्व मतदारसंघासह राज्यातील ३० जागांसाठी आमची चाचपणी सुरू आहे. बीड, मालेगाव, विदर्भ व मुंबईतील दोन मतदारसंघावर अधिक लक्ष केंद्रित असून ३० जागांसाठी चाचपणी सुरू आहे. शहरात माझ्यासह सर्व इच्छुकांच्या अनुषंगाने मोठ्या एजन्सीतर्फे सर्व्हे सुरू आहे. त्यांच्या निष्कर्षानंतर उमेदवार व मतदारसंघ निश्चित केला जाईल, हे सांगताना जलील यांनी स्वत: विधानसभा लढणार असल्याचेही संकेत दिले.
आघाडी, युतीत खंजीर घेऊन बसतात
सध्याची राजकीय परिस्थिती अत्यंत बिकट आहे. महाविकास आघाडी, महायुतीमधील नेते सोबत खंजीर घेऊन एकमेकांसोबत राहतात. यातील कोण कधी खंजीर उपसेल, याचा अंदाज नाही. मात्र, समविचारी पक्षांनी एकत्र आल्यास निश्चित फायदाच, असेही जलील यांनी स्पष्ट केले.