प्रचंड उलथापालथ अन् चर्चेचा दिवस

By Admin | Updated: September 27, 2014 01:11 IST2014-09-27T01:07:38+5:302014-09-27T01:11:01+5:30

शांतीलाल गायकवाड, औरंगाबाद महायुती व आघाडीने एकमेकांपासून काडीमोड घेतल्यानंतरचा दुसरा दिवस प्रचंड उलथापालथ व चर्चेचा ठरला.

Heavy vicissitudes and discussion day | प्रचंड उलथापालथ अन् चर्चेचा दिवस

प्रचंड उलथापालथ अन् चर्चेचा दिवस

शांतीलाल गायकवाड, औरंगाबाद
महायुती व आघाडीने एकमेकांपासून काडीमोड घेतल्यानंतरचा दुसरा दिवस प्रचंड उलथापालथ व चर्चेचा ठरला. कुणालाच कुणाचा धरबंद राहिला नाही, ना पक्षनिष्ठा. संधी मिळेल तशा कोलांटउड्या घेताना कार्यकर्ते, नेते दिसत होते. एका बाजूला उमेदवारीसाठीची धावपळ, तर दुसऱ्या बाजूला उमेदवारांचा शोधही सुरू होता. सोशल मीडियावरून झटपट अपडेटस् शेअर केल्या जात होत्या. चर्चा, रंगत होत्या. पैजा झडत होत्या.
महायुती व आघाडी गुरुवारी फुटली. शुक्रवारी चर्चेचा हा एकमेव विषय होता. त्यात राजकारण क्षणोक्षणी वेगाने बदलत होते. अरे याचे तिकीट फायनल झाले. त्याने पक्षाचा राजीनामा दिला, त्याने आपला पक्ष सोडून या पक्षाच्या तिकिटासाठी प्रयत्न सुरू केले, अशा अनेक घटना, घडामोडी वेगाने सुरू होत्या. विशेषत: शिवसेनेचे माजी आमदार किशनचंद तनवाणी यांनी भाजपाच्या तिकिटावर औरंगाबाद ‘मध्य’ मधून लढण्याचा निर्णय घेतल्याची बातमी माध्यमापर्यंत पद्धतशीरपणे पोहोचविण्यात आली होती. ही बातमी मोठी चर्चेची ठरली. ते सायंकाळी भाजपाचा एबी फॉर्म घेऊन आल्याचे स्पष्ट झाले. तनवाणी यांच्या उमेदवारीने आमदार प्रदीप जैस्वाल यांचे काय होणार, या चर्चेला त्यानंतर तोंड फुटले. शिवसेना, भाजपाचे (पान २ वर)
मध्यचे उमेदवार स्पष्ट झाल्यानंतर या मतदारसंघात काँग्रेसचा उमेदवार कोण, अशी विचारणा होऊ लागली. राष्ट्रवादीकडून इच्छुक असलेले कदीर मौलाना काँग्रेसमध्ये येणार अशा पोस्ट व्हॉटस्अपवरून फिरत होत्या.
औरंगाबाद पश्चिममधूनही भाजपाचा उमेदवार कोण, अशी विचारणा दिवसभर सुरू होती. कुणी माजी उपमहापौर राजू शिंदे यांचे नाव सांगत होते, तर कुणी नगरसेवक मधुकर सावंतचे नाव पुढे करीत होते. राष्ट्रवादीला या मतदारसंघात उमेदवार सापडत नसल्याची चर्चा बराच वेळ रंगली होती. औरंगाबाद पूर्वचे बरेचसे चित्र सकाळीच स्पष्ट झाले होते. खा. चंद्रकांत खैरे हे रुग्णालयात दाखल असताना तेथून महापौर कला ओझा यांची पूर्वमधून शिवसेनेची उमेदवारी त्यांनी घोषित केली. तर आ.अकबरुद्दीन ओवेसी यांनी सकाळीच पत्रपरिषद घेऊन गफ्फार कादरी यांना ‘पूर्व’ मधून एमआयएमची उमेदवारी घोषित केली. तोच राष्ट्रवादीचे उमेदवार म्हणून जुबेर मोतीवाला यांचे नाव सोशल मीडियावरून फिरत होते. परंतु रात्री उशिरापर्यंत भाजपाला या मतदारसंघातून उमेदवार मिळाला नव्हता. संजय केणेकर की अतुल सावे, असे त्रांगडे सुटत नव्हते. दुपारनंतर मात्र, संजय केणेकर हेच उमेदवार असल्याची अफवा पसरली. तोच रात्री उशिरा पश्चिममधून राष्ट्रवादीने रिपब्लिकन सेनेचे नगरसेवक मिलिंद दाभाडे यांच्या नावाची चर्चा सुरू केली होती.
पक्षाची फाटाफूट झाल्यामुळे कार्यकर्त्यांची फुटाफूट सुरू होती. ही संधी साधून अनेक हौशानौशांनी उमेदवारी दाखल करण्यासाठी धावपळ सुरू केल्याचे दिसत होते.
शहराप्रमाणेच ग्रामीण भागातूनही हीच परिस्थिती होती. कन्नडमधून आ. हर्षवर्धन जाधव यांना शिवसेनेच्या तिकिटावर उमेदवारी भरण्यापासून भाजपाच्या नेत्यांनी रोखल्याची चर्चा होती. तर गंगापूरमधून आ. प्रशांत बंब यांचा त्यांच्या कार्यालयावर भाजपाच्याच निष्ठावंत कार्यकर्त्यांनी निषेध करणे सुरू केले होते.

दूरचित्रवाहिन्यांवरून प्रसारित होणाऱ्या बातम्याही चवीने चर्चिल्या जात होत्या. महायुती तुटल्यानंतर खा. आठवले यांची भूमिका काय, त्यांना केंद्रात मंत्रिपद दिल्याची चर्चा झाली. तोच शिवसेना व मनसे एकत्र लढू शकतात, या वृत्ताने खळबळ उडाली. ही युती झाली तर तिचे काय परिणाम होतील, कोणाला फटका बसेल, भाजपा जमिनीवर येईल, शिवसेना व मनसे सत्तेवर येईल, अशा एक ना अनेक चर्चा गटागटाने सुरू होत्या.

Web Title: Heavy vicissitudes and discussion day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.