शिवाजीनगर भुयारी मार्गात जड वाहनांच्या प्रवेशाने कोंडी; ३ पत्रानंतरही कमानीची उंची कायम
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2026 19:43 IST2026-04-07T19:39:30+5:302026-04-07T19:43:00+5:30
'राईट टर्न'चा तिढा आणि गायब झालेले साईनबोर्ड; शिवाजीनगर भुयारी मार्गातील गोंधळावर वाहतूक पोलिसांचे मोठे निरीक्षण.

शिवाजीनगर भुयारी मार्गात जड वाहनांच्या प्रवेशाने कोंडी; ३ पत्रानंतरही कमानीची उंची कायम
छत्रपती संभाजीनगर : शिवाजीनगर भुयारी मार्गात रोज जड अवजड वाहनांचा बेकायदेशीर प्रवेशच वाहतूक कोंडीचे प्रमुख कारण ठरत आहे. ही बाब लक्षात घेऊन दोन्ही बाजूंच्या लोखंडी कमानीची उंची कमी करण्यासाठी वाहतूक पोलिसांनी जागतिक बँक प्रकल्पाच्या अभियंत्यांना तीन वेळा पत्रे पाठविली. मात्र, अद्यापपर्यंत त्यांच्या या मागणीला कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही. आता मनपाने पुढाकार घेतल्यानंतरही ही समस्या सुटेल का, असा प्रश्न नागरिकांसह वाहतूक पोलिसांना पडला आहे.
१५ फेब्रुवारी २०२५ रोजी भुयारी मार्गाचे लोकार्पण करण्यात आले. सोयीसाठी तयार करण्यात आलेला हा भुयारी मार्ग सोयीचा ठरण्याऐवजी उलट अडचणीचा ठरत असून, सातारा-देवळाईकरांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. पावसाळ्यात पाणी साचण्याबरोबरच रोज कार्यालयीन वेळेत येथे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. प्रामुख्याने सकाळी १० ते १ व सायंकाळी ५ ते ८ या वेळेत नागरिकांना तासनतास कोंडीचा सामना करावा लागतो. ही बाब लक्षात घेऊन वाहतूक पोलिसांनी भुयारी मार्गात जड अवजड वाहनांचा प्रवेश बंद करण्यासाठी दोन्ही बाजूंच्या लोखंडी कमानीची उंची कमी करण्याचा प्रस्ताव मांडला होता.
‘राईट टर्न’ला लागतो वेळ
शिवाजीनगर व देवळाई चौकात वाहतूक नियोजनासाठी चार वाहतूक पोलिस कर्मचारी तैनात असतात. जड अवजड वाहनांना बंदी घालून त्यांना शहानूरमियाँ दर्गा चौकातून वळवावी. जेणेकरून शिवाजीनगरकडून मुकुंदवाडीच्या दिशेने वळण घेणाऱ्या वाहनांना कमी वेळ लागून शिवाजीनगर भुयारी मार्गातील वाहतुकीचा भार कमी होईल, असे निरीक्षण वाहतूक पाेलिस अधिकाऱ्यांनी नोंदविले.
बंदीचे साइनबोर्ड नाहीत
भुयारी मार्गात जड अवजड वाहनांना बंदी घालून दर्शनी भागात लोखंडी साइनबोर्ड लावणे आवश्यक असल्याचे मत पोलिसांनी व्यक्त केले. बॅनरवरील सूचनाफलक असून, ते चालकांना स्पष्ट दिसत नाहीत. अनेकदा अवजड वाहने अडकल्यानंतर चाकातील हवा सोडून वाहन बाहेर काढावे लागते, असे वाहतूक पोलिसांनी सांगितले.