छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात मुसळधार आणि काही ठिकाणी झालेल्या ढगफुटीसदृश पावसाने दाणादाण उडविली असून, पावसाने ६ नागरिकांचे बळी घेतले आहेत. नांदेड जिल्ह्यात ३, बीडमध्ये १ आणि हिंगोलीमध्ये दोघांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय दोनशेपेक्षा अधिक जनावरांचा मृत्यू झाला असून, हजारो एकर शेती पाण्याखाली गेली आहे.
मागील २४ तासांत मराठवाड्यातील ५७ मंडळांत अतिवृष्टी झाली. चार दिवसांपासून पाऊस मराठवाड्याला झोडपत असून, अनेक धरणे शंभर टक्के भरली असून, मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरू आहे. रविवारी झालेल्या ढगफुटीसदृश पावसाचे नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यात हाहाकार उडाला असून, पाण्यात वाहून गेल्याने तीन महिलांचा मृत्यू झाला आहे. पुराच्या पाण्यामुळे काही ठिकाणचे पूल वाहून गेल्याने व अनेक ठिकाणी पुलावर पाणी आल्याने वाहतूक ठप्प झाली आहे.
दरम्यान, मुखेड तालुक्यात पुरात अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी ‘एनडीआरएफ’सह छत्रपती संभाजीनगरहून सैन्यदलाला पाचारण करण्यात आले आहे. मराठवाड्यात आठही जिल्ह्यांत रविवारी रात्री जोरदार पाऊस बरसला.
१५ आणि १६ ऑगस्ट रोजी झालेल्या मुसळधार पावसानंतर रविवारी रात्री आणि सोमवारी पहाटे पावसाचा जोर पुन्हा वाढला. नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्याला सर्वाधिक फटका बसला. ढगफुटीसदृश पावसाने लेंडी नदीची पाणीपातळी १८ फुटांनी वाढल्याने नदीशेजारील गावे पाण्यात गेली. नागरिकांना छातीएवढ्या पाण्यातून जीव मुठीत घेऊन बाहेर पडावे लागले. पुरामुळे १० ते १२ व्यक्ती वाहून गेले. यापैकी तीन महिलांचे मृतदेह मिळाले आहेत.
हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यात ओढ्याला आलेल्या पुराच्या पाण्याचा अंदाज न आल्याने १६ ऑगस्ट रोजी सायंकाळी वाहून गेलेल्या शेतकऱ्याचा मृतदेह तब्बल ३६ तासांनी १८ ऑगस्ट रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास आढळला. दुसऱ्या एका घटनेत धबधब्यावर पोहण्यास गेलेल्या तरुणाचा मृत्यू झाला.
बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यात १७ ऑगस्ट रोजी रात्री मुसळधार पावसामुळे लिंगी नदीला आलेल्या पुरात एक थरारक घटना घडली. लग्नावरून परतणाऱ्या चार मित्रांची कार कौडगाव हुडा शिवारात पुलावरून वाहून गेली. या घटनेत एका मित्राचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर तिघांना ग्रामस्थ आणि पोलिसांनी मोठ्या प्रयत्नांनी वाचविले.
लातूर जिल्ह्यात रविवारी रात्री मुसळधार पावसाने झोपडल्याने उदगीर तालुक्यातील बोरगाव, धडकनाळ गावांस पुराच्या पाण्याने वेढा घातला. त्यामुळे या गावांतील ३३० नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. या आपत्तीत ७० शेळ्या आणि १० मोठी जनावरे दगावली असून, शेकडो एकरवरील पिके पाण्यात आहेत. तसेच दोन ट्रॅक्टर, एक पिकअप वाहन वाहून गेले. सहा मार्गावरील पूल पाण्याखाली गेल्याने वाहतूक बंद आहे.