आता आरोग्य केंद्रांना मिळणार ‘आॅक्सिजन’
By Admin | Updated: September 28, 2016 00:46 IST2016-09-28T00:22:04+5:302016-09-28T00:46:23+5:30
औरंगाबाद : जिल्ह्यातील ग्रामीण रुग्ण सेवा अत्याधुनिक करण्यावर आरोग्य सभापती विनोद तांबे यांनी भर दिला आहे. जि.प.च्या सर्व ५० प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये

आता आरोग्य केंद्रांना मिळणार ‘आॅक्सिजन’
औरंगाबाद : जिल्ह्यातील ग्रामीण रुग्ण सेवा अत्याधुनिक करण्यावर आरोग्य सभापती विनोद तांबे यांनी भर दिला आहे. जि.प.च्या सर्व ५० प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये लवकरच आॅक्सिजन सप्लिमेंटरी यंत्रणा बसविली जाणार आहे. ज्यामुळे ग्रामीण भागातील अत्यवस्थ रुग्णांना शहरातील महागड्या हॉस्पिटलमध्ये भरती होण्याची वेळ येणार नाही.
यासंदर्भात आरोग्य सभापती विनोद तांबे व प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विवेक खतगावकर यांनी सांगितले की, नावीन्यपूर्ण उपक्रमांतर्गत आॅक्सिजन सप्लिमेंटरी यंत्रणा खरेदी करण्याचा निर्णय आरोग्य विषय समितीमध्ये घेण्यात आला आहे. आरोग्य विभागाला शासनाकडून यंत्रसामुग्री खरेदी करण्यासाठी निधी मिळाला होता. यातील शिल्लक निधीतून जवळपास २० ते २५ लाख रुपये हे हवेपासून शुद्ध आॅक्सिजन तयार करणारे यंत्र, सिलिडंर, पाईपलाईन खरेदी करणे व ते आरोग्य केंद्रात बसविण्यासाठी खर्च केले जातील. येणाऱ्या सर्वसाधारण सभेत या उपक्रमास मान्यता घेतल्यानंतर तांत्रिक मान्यतेसाठी हा प्रस्ताव आरोग्य संचालकांकडे पाठविला जाईल.
जिल्ह्यात साथरोगांवर नियंत्रण मिळविण्यास आरोग्य विभागाला यश आले असले, तरी सध्या ग्रामीण भागात डेंग्यू, चिकुन गुनिया, मलेरियाचे रुग्ण वाढत आहेत. एखाद्या गावात अशा प्रकारची लागण झाली असल्यास तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयामार्फत तात्काळ डॉक्टरांचे शीघ्र कृतिदल तिकडे रवाना करण्यात येते. आपेगाव, पारुंडी, जरंडी, नागद येथे काही नागरिकांना डेंग्यूची लागण झाल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्या गावांमध्ये तात्काळ डॉक्टरांचे शीघ्र कृतिदल रवाना करून रुग्णांवर औषधोपचार करण्यात आले. गावात धूर फवारणी करण्यात आली. कोरडा दिवस पाळण्याबाबत नागरिकांमध्ये जागृती करण्यात आली.
सध्या डेंग्यूविषयी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे; पण नागरिकांनी खाजगी पॅथालॉजी लॅबमध्ये यासंबंधीची तपासणी न करता शासकीय रुग्णालय व महाविद्यालयाच्या प्रयोगशाळेत यासंबंधीची तपासणी करावी. खाजगी लॅबची तपासणी महागडी आहे. गरीब रुग्णांना ती परवडणारी नाही. खाजगी लॅबमधील तपासणी शुल्काबाबत कसलीही एकवाक्यता नाही. तपासणी शुल्कावर नियंत्रण ठेवण्यासाठी आपण जिल्हाधिकारी डॉ. निधी पांडे यांच्याकडे विनंती करणार आहोत, असे आरोग्य सभापती विनोद तांबे यांनी सांगितले.