रिक्त जागांमुळे आरोग्य सेवा विस्कळीत

By Admin | Updated: July 27, 2014 01:10 IST2014-07-27T00:19:47+5:302014-07-27T01:10:22+5:30

कडा : आष्टी तालुक्यातील ग्रामीण रुग्णालय प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रातील अनेक डॉक्टर व कर्मचाऱ्यांच्या जागा गेल्या वर्षभरापासून रिक्त आहेत.

Health care disrupted due to empty seats | रिक्त जागांमुळे आरोग्य सेवा विस्कळीत

रिक्त जागांमुळे आरोग्य सेवा विस्कळीत

कडा : आष्टी तालुक्यातील ग्रामीण रुग्णालय प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रातील अनेक डॉक्टर व कर्मचाऱ्यांच्या जागा गेल्या वर्षभरापासून रिक्त आहेत. त्यामुळे तालुक्यातील तब्बल सव्वा दोन लाख नागरिकांच्या आरोग्याचा भार ४३ कर्मचाऱ्यांवरच आहे. ही संख्या अल्प असल्याने आरोग्य सेवा विस्कळीत झाल्याचे चित्र अनेक ठिकाणी पाहावयास मिळत आहे.
आष्टी तालुक्यात आष्टी येथे ग्रामीण रूग्णालय आहे. तर टाकळसिंग, धामणगाव, खुंटेफळ, सुलेमान देवळा, कडा येथे प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत. या प्राथमिक आरोग्य उपकेंद्रांतर्गत ३८ आरोग्य केंद्र आहेत. या सर्व ठिकाणी मिळून ९२ कर्मचाऱ्यांच्या पदांना मंजूरी देण्यात आली आहे, असे असले तरी प्रत्यक्षात मात्र ४३ कर्मचारी उपस्थित आहेत. तब्बल ४९ कर्मचाऱ्यांच्या जागा रिक्त आहेत. यामुळे अनेक ठिकाणी उपचार करण्यास वेळेवर डॉक्टर व कर्मचारीही नसतात. यामुळे रूग्णांचे अतोनात हाल होत असल्याचे सामाजिक कार्यकर्ते दादासाहेब जगताप यांनी सांगितले.
नागरिकांच्या आरोग्यावर शासन कोट्यवधी रुपये खर्च करते. मात्र डॉक्टर व कर्मचाऱ्यांअभावी रूग्णांना वेळेवर उपचार मिळणेही मुश्कील झाले आहे. सध्या पावसाळा असल्याने लहान मुलांसह नागरिकांमध्ये सर्दी, थंडी, ताप, खोकला अशा आजारांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे अनेक ठिकाणच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात रूग्णांची गर्दी दिसून येते. अशावेळी पुरेसे डॉक्टर व कर्मचारी नसल्याने रूग्णांना समस्यांना तोंड द्यावे लागत असल्याचे चित्र आष्टी, कडा, धामणगाव, धानोरा आदी ठिकाणच्या आरोग्य केंद्रात पहावयास मिळत आहे. नागरिकांच्या आरोग्यासह साथरोग फैलावू नयेत, याची जबाबदारीही आरोग्य कर्मचाऱ्यांवर असते. यासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांना ग्रामपंचायतच्या सहकार्याने विविध उपक्रमही राबवावे लागतात. तसेच पिण्यासाठी असलेल्या पाण्याची तपासणी, गावात घाण किंवा डबके साचले असल्यास तेथे गप्पी मासे सोडणे आदी कामेही आरोग्य कर्मचाऱ्यांना करावी लागतात. तालुक्यात १०२ ग्रामपंचायती आहेत. या ठिकाणी स्वच्छतेसह इतर बाबींची दक्षता घेण्यासाठीही आरोग्य कर्मचाऱ्यांची कमतरता भासत असल्याचे शहनवाज पठाण यांनी सांगितले. याबाबत आष्टीचे गटविकास अधिकारी उद्धव सानप म्हणाले, साथरोग फैलावू नयेत यासाठी काळजी घेण्यात येत आहेत. तर रिक्त पदांबाबत तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. बापू चाबुकस्वार म्हणाले, रिक्त पदे भरण्यासाठी वरिष्ठांकडे पाठपुरावा सुरू आहे. (वार्ताहर)
आरोग्याचा भार ४३ कर्मचाऱ्यांवर
तालुका वैद्यकीय
अधिकाऱ्यांना झाला डेंग्यू
येथील तालुका वैद्यकीय अधिकारी यांच्या कार्यालयाच्या परिसरातही घाणीचे साम्राज्य आहे. तसेच अनेक ठिकाणी दौऱ्यावर असताना त्यांना घाणीचा सामना करावा लागतो. परिणामी त्यांनाच डेंग्यू झाल्याचे दिसून आले. त्यांनाच डेंग्यू झाला म्हटल्यावर सामान्यांचे काय ?असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Web Title: Health care disrupted due to empty seats

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.