मुख्याध्यापकांना ‘डेडलाईन’

By Admin | Updated: January 9, 2015 00:52 IST2015-01-09T00:20:47+5:302015-01-09T00:52:26+5:30

बीड : जिल्हा परिषद तसेच खासगी शाळांची संचमान्यता आता आॅनलाईन होणार आहे. त्यासाठी मुख्याध्यापकांना १५ जानेवारीची ‘डेडलाईन’ देण्यात आली आहे

Headlines 'deadline' | मुख्याध्यापकांना ‘डेडलाईन’

मुख्याध्यापकांना ‘डेडलाईन’


बीड : जिल्हा परिषद तसेच खासगी शाळांची संचमान्यता आता आॅनलाईन होणार आहे. त्यासाठी मुख्याध्यापकांना १५ जानेवारीची ‘डेडलाईन’ देण्यात आली आहे. सहसंचालकांनी गुरुवारी ‘व्हिडिओ कॉन्फरन्स’मध्ये याबाबतच्या सूचना दिल्या.
३० सप्टेंबर २०१४ रोजीच्या पटसंख्येवरुन आॅनलाईन संचमान्यतेच्या नोंदी करावयाच्या आहेत. त्यासाठी शिक्षण विभागाने सॉफ्टवेअर विकसीत केले आहे. त्यातील प्रपत्रात शाळेच्या संदर्भातील माहिती भरावयाची आहे. एकूण ९ रकाण्यात माहिती द्यायची आहे. आॅनलाईन संचमान्यतेमुळे शाळांबद्दची कुठलीच माहिती दडविता येणार नाही. संचमान्यता आॅनलाईन केल्याशिवाय विद्यार्थी, शिक्षकांना कुठलेच लाभ न देण्याचा टोकाचा निर्णय शिक्षण विभागाने घेतलेला आहे. त्यामुळे मुख्याध्यापकांचे काम वाढले आहे. मुख्याध्यापकांनी संचमान्यता केल्यानंतर मोबाईल किंवा संगणकावरुन आॅनलाईन ही माहिती केंद्रप्रमुखांना कळवायची आहे. त्यानंतर केंद्रप्रमुखांमार्फत ‘डाटा’ गटशिक्षणाधिकाऱ्यांकडे जाईल. गटशिक्षणाधिकारी माहिती तपासून चुका दुरुस्त करतील अन् अंतिम डाटा शिक्षणाधिकाऱ्यांकडे पाठवतील. आॅनलाईन प्रक्रियेमुळे कारभारात पारदर्शकता येणार असून शिक्षण विभाग ‘पेपरलेस’ होणार आहे.
राज्याचे शिक्षण सहसंचालक सुनील मगर यांनी व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये शिक्षणाधिकारी (प्रा.) बी. ए. तुपे यांच्यासह शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांशी संवाद साधून सूचना दिल्या.
हलगर्जी कराल तर मुकाल!
उपशिक्षणाधिकारी (मा.) धनंजय शिंदे म्हणाले की, आॅनलाईन संचमान्यता प्रत्येक शाळेसाठी अनिवार्य आहे. ही माहिती मुख्याध्यापकांनी वेळेत द्यावी. अन्यथा संचमान्यतेशिवाय शाळांना कुठलेच लाभ मिळणार नाहीत. शिक्षकांचे वेतन, विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती तसेच इतर लाभ यापासून वंचित रहावे लागेल. त्यामुळे मुख्याध्यापकांनी संधी दवडू नये, असे आवाहन त्यांनी केले आहे. मुख्याध्यापकांनी आवश्यकता भासल्यास शिक्षण विभागाची मदत घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
यापूर्वीच सूचना
आॅनलाईन संच मान्यतेसाठी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने मुख्याध्यापकांना यापूर्वीच सूचना दिल्या होत्या. त्यानुसार काही मुख्याध्यापकांनी प्राथमिक माहिती संकलित करून ठेवली आहे. मात्र, असे असले तरी काही मुख्याध्यापकांना आॅनलाईन प्रक्रिया जमेल की नाही याबाबतच शंका आहे. मुख्याध्यापक मोबाईलवरूनही माहितीचा एसएमएस करू शकतात. (प्रतिनिधी)
शिक्षण विभागाच्या संकेतस्थळावर शाळेचे नाव, पूर्ण पत्ता, यूडायएस क्रमांक, मुख्याध्यापकांचे नाव व भ्रमणध्वनी क्रमांक, शाळा व मुख्याध्यापकांचे मेल आयडी, १ जानेवारी २०१५ रोजी कार्यरत मान्य शिक्षक पदे, सध्या कार्यरत शिक्षकसंख्या, पदवीधर, उपशिक्षणाधिकारी संख्या, ३० सप्टेंबर २०१४ रोजीची पटसंख्या, एकूण वर्ग संख्या, एकूण खोल्या ही माहिती भरावयाची आहे.

Web Title: Headlines 'deadline'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.