तलवार फेकून कारखाली लपला, मात्र पोलिसांच्या नजरेतून नाही सुटला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 19:19 IST2021-04-24T19:18:13+5:302021-04-24T19:19:39+5:30
Young man arrested with sword शुक्रवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास भारतनगर येथील मळ्यामध्ये दोन तरुण तलवार घेऊन आल्याची माहिती सजग नागरिकाने पोलीस नियंत्रण कक्षाला कळविली.

तलवार फेकून कारखाली लपला, मात्र पोलिसांच्या नजरेतून नाही सुटला
औरंगाबाद : पोलिसांना पाहून तलवार फेकून देत शेजारील कारखाली लपून बसलेल्या तरुणाला पुंडलिकनगर पोलिसांनी शुक्रवारी रात्री भारत नगर येथील मळ्यात अटक केली. त्याचा एक साथीदार फरार झाला असून पोलिसांनी तलवार जप्त केली. राहुल ज्ञानेश्वर दाभाडे (वय २२, रा. भारत नगर) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. राहुलचा साथीदार गणेश तनपुरे हा फरार झाला आहे.
शुक्रवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास भारतनगर येथील मळ्यामध्ये दोन तरुण तलवार घेऊन आल्याची माहिती सजग नागरिकाने पोलीस नियंत्रण कक्षाला कळविली. नियंत्रण कक्षाने तातडीने पुंडलिकनगर पोलिसांना ही बाब कळवून कारवाईचे आदेश दिले. गस्तीवरील पोलिसांनी तत्काळ तेथे धाव घेतली. तेव्हा तेथे तलवारीसह दोन तरुण उभे दिसले. यावेळी पोलीस आल्याचे पाहून तनपुरेने धूम ठोकली, तर राहुलने त्याच्या हातातील तलवार एका कंपाउंड वॉलच्या आत फेकली आणि तो कार खाली लपण्यासाठी झोपला. पोलिसांनी त्याला कारखालून बाहेर काढले आणि त्याने फेकलेली तलवार जप्त केली. बीट मार्शल शिंदे यांच्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदविला. आरोपी राहुलला अटक केली. फरार तनपुरेचा शोध सुरू असल्याचे सहायक पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांनी सांगितले. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक धनाजी आढाव करीत आहेत.