महापालिकेत प्रलंबित १५० फायलींचा तडकाफडकी निपटारा! ‘लाचलुचपत’च्या कारवाईचा परिणाम
By मुजीब देवणीकर | Updated: June 28, 2023 12:07 IST2023-06-28T12:04:51+5:302023-06-28T12:07:10+5:30
प्रत्येक फायलीवर आवक-जावक क्रमांक, दिनांक असतो. या फायली का थांबल्या होत्या, याचा साधा शोधही प्रशासनाने सुरू केला नाही.

महापालिकेत प्रलंबित १५० फायलींचा तडकाफडकी निपटारा! ‘लाचलुचपत’च्या कारवाईचा परिणाम
छत्रपती संभाजीनगर : महापालिकेतील अतिरिक्त आयुक्तांच्या स्वीय सहायकाला चार दिवसांपूर्वी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ऑनलाईन लाच दुसऱ्याच्या मोबाईलवर स्वीकारली म्हणून अटक केली. या घटनेनंतर प्रशासनात एकच खळबळ उडाली. अतिरिक्त आयुक्तांकडे मागील काही दिवसांपासून प्रलंबित तब्बल १५० फायली मंजूर झाल्याची माहिती आहे. लाचप्रकरणात महापालिकेने या प्रकरणी कोणतीही चौकशी समिती नेमली नाही, हे विशेष.
जी-२० मध्ये भितींवर आकर्षक चित्र काढणाऱ्या एका कलाकाराचे बिल मनपाकडे प्रलंबित होते. १ कोटी १३ लाख रुपयांचे बिल अर्धा टक्क्यांनुसार मंजूर करण्यासाठी अतिरिक्त आयुक्तांचा स्वीय सहायक मनोज मारवाडी याने ६० हजारांची लाच घेतली. ही रक्कम मित्राच्या फाेन-पेवर स्वीकारली. एसीबीने मारवाडी याला अटक केली. या प्रकरणातील अनेक भानगडी आता समोर येत आहेत. मारवाडी याने ही रक्कम कोणासाठी स्वीकारली, याचा शोध एसीबी घेत आहे.
घटनेनंतर अतिरिक्त आयुक्त रणजित पाटील यांच्या कार्यालयात प्रलंबित असलेल्या जवळपास १५० फायली सह्या करून वेगवेगळ्या विभागांकडे पाठविण्यात आल्या. प्रत्येक फायलीवर आवक-जावक क्रमांक, दिनांक असतो. या फायली का थांबल्या होत्या, याचा साधा शोधही प्रशासनाने सुरू केला नाही. दरम्यान, यासंदर्भात बोलताना पाटील यांनी सांगितले की, माझ्याकडे कोणतीही फाईल दोन ते तीन दिवसांपेक्षा जास्त दिवस राहत नाही. फायली प्रलंबित ठेवण्याचे कारणही नाही. काही फायलींवर आपण जाणीवपूर्वक चर्चा, स्थळ पाहणी लिहिता असा आरोप होतोय, असे विचारले असता ते म्हणाले की, परिस्थितीनुसार निर्णय घ्यावे लागतात. काही ठिकाणी अधिकाऱ्यांशी चर्चा करणे आवश्यक असते.
मनोज मारवाडी अखेर निलंबित
मनपा प्रशासनाने मनोज मारवाडी याच्या निलंबनाचे आदेश काढले आहेत. मंगळवारी प्रशासकांकडून आदेशाच्या फाईलवर सही झाली. शुक्रवारपासून हे निलंबनाचे आदेश लागू असतील, असे मनपातील सूत्रांनी सांगितले.