खुलताबादेत हनुमानभक्तांची मांदियाळी
By Admin | Updated: July 27, 2014 01:19 IST2014-07-27T00:57:57+5:302014-07-27T01:19:24+5:30
खुलताबाद : शनी अमावास्येनिमित्त खुलताबाद येथील भद्रा मारुतीच्या दर्शनाला भाविकांची मोठी गर्दी झाली होती. दिवसभरात लाखो भाविकांनी दर्शन घेतल्याचा अंदाज आहे.
खुलताबादेत हनुमानभक्तांची मांदियाळी
खुलताबाद : शनी अमावास्येनिमित्त खुलताबाद येथील भद्रा मारुतीच्या दर्शनाला भाविकांची मोठी गर्दी झाली होती. दिवसभरात लाखो भाविकांनी दर्शन घेतल्याचा अंदाज आहे.
भद्रा मारुतीच्या दर्शनासाठी पहाटेपासूनच भाविकांची गर्दी सुरू झाली होती. सकाळपासून दर्शनाच्या रांगा लागल्या होत्या. भाविकांना सुरळीत दर्शन व्हावे म्हणून भद्रा मारुती संस्थानने सभामंडपात बॅरिकेटस् लावून दर्शन रांग केल्याने व्यवस्थित व चांगले दर्शन झाले होते.
भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेता एस.टी. महामंडळाने औरंगाबाद-खुलताबाद मार्गावर जादा बसेस सोडल्या होत्या. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस निरीक्षक शिवलाल पुरभे यांनी चोख बंदोबस्त तैनात केला होता. भाविकांचे दर्शन सुरळीत व्हावे भद्रा मारुती संस्थानचे पदाधिकारी व स्वयंसेवक परिश्रम घेत होते.
त्याचप्रमाणे अर्जंट दर्शन ५० रुपये ठेवण्यात आल्याने भाविकांनी या स्पेशल दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. स्पेशल दर्शनाच्या रांगेतही गर्दी झाली असल्याने दर्शनास अर्धा-पाऊणतास लागत होता.
पवनपुत्र हनुमान की जय, भद्रा मारुती की जय म्हणत लोक दर्शन घेत होते. भाविकांनी दर्शनासोबतच म्हैसमाळ, दौलताबाद, वेरूळ आदी पर्यटनाचा आनंदही घेतला. (वार्ताहर)
वेरूळमध्ये ट्रॅफिक जाम
शनी अमावास्येमुळे भद्रा मारुतीच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांनी आज घृष्णेश्वराचे दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी केली होती. वेरूळ येथे तीर्थकुंडापासून ते वेळगंगा नदीपर्यंत भाविकांनी रस्त्यावरच वाहने उभी केल्याने वाहतुकीची मोठी कोंडी झाली होती. वाहतूक पोलीस वाहतूक सुरळीत करण्याऐवजी महामार्गावर परराज्यातील वाहनधारकांकडून ‘चिरीमिरी’ गोळा करण्यात मग्न होते. कसाबखेडा मार्गावर जड वाहनांच्या तपासणीच्या नावाखाली नेहमीच रांगा लागतात. त्यामुळे वाहनधारक वैतागून जातात.