छत्रपती संभाजीनगरात भरदार मिशीवाला हनुमान, तुम्ही घेतले का दर्शन ?

By प्रशांत तेलवाडकर | Published: April 25, 2024 04:26 PM2024-04-25T16:26:03+5:302024-04-25T16:26:50+5:30

मिशीवाला मारुती असे वाचले की, अधिक माहिती जाणून घेण्याची तुमची उत्सुकता वाढली असेल...

Hanuman with the big mustache in Chhatrapati Sambhajinagar, have you taken darshan? | छत्रपती संभाजीनगरात भरदार मिशीवाला हनुमान, तुम्ही घेतले का दर्शन ?

छत्रपती संभाजीनगरात भरदार मिशीवाला हनुमान, तुम्ही घेतले का दर्शन ?

छत्रपती संभाजीनगर : तुम्ही आतापर्यंत हनुमानाची अनेक मंदिरे पाहिले असतील... पण त्यात मिशी-दाढी असलेली हनुमान मूर्ती दुर्मिळच. आपल्या शहरात बजरंगबलीची २१४ मंदिरे आहेत. विविध रूपे व आकारातील मूर्ती आहेत, पण त्यात एकच मंदिर असे आहे, जिथे मिशीवाला हनुमान आहे.

मिशीवाला मारुती असे वाचले की, अधिक माहिती जाणून घेण्याची तुमची उत्सुकता वाढली असेल... असे अनेक भाविक असतील, ज्यांनी या मारुतीचे दर्शन घेतले असेल.

भरदार मिशी हेच वैशिष्ट्य
कैलासनगरातील स्मशानभूमीच्या उत्तर बाजूस एक मंदिर आहे. या मंदिरालाच स्मशान हनुमान मंदिर या नावानेच ओळखले जाते. स्मशान हनुमानाच्या मूर्तीलाच भरदार काळी गडद मिशी आहे. काही भाविकांच्या मते अशी पिळदार गडद मिशी राखलेली शहरातच नव्हे, तर महाराष्ट्रातील एकमेव ही हनुमानाची मूर्ती असावी.

काळ्या पाषाणातील शेंदूरवर्णीय मूर्ती
मूर्ती काळ्या पाषाणातील आहे. त्यावर शेंदराचा लेप चढविण्यात आला आहे. रूद्र स्वरुपातील ही मूर्ती वीर हनुमानाची जाणीव करून देते. वीरासनात बसलेला हनुमानाचा एक गुडघा जमिनीला टेकवलेला व दुसरा उंच केलेला आहे. एका हातात गदा आहे. पटकन उठता येईल अशा स्थितीत ही मूर्ती आहे. हनुमानाचे डोळेही मोठे असून उग्र रूप धारण केले आहे.

दिवसभरात दिसतात तीन रूपे
भाविकांची अशी श्रद्धा आहे की, या हनुमानाची दिवसभरात तीन रूपे पाहण्यास मिळतात. सकाळी बालरूप, दुपारी तरुण व रात्री ज्येष्ठाच्या रूपात मूर्ती पाहण्यास मिळते. मंदिराच्या विश्वस्तांनी सांगितले की, या मूर्तीची स्थापना श्री रामदास स्वामी यांनी केली आहे. मात्र, यासंदर्भातील काही पुरावे नाहीत. या मूर्तीला मिशा का आहेत, याची काही आख्यायिकाही कोणाला माहीत नाही. मात्र, गाभाऱ्यावरून हेमाडपंती बांधकाम असलेले ३५० वर्षांपेक्षा जुने हे मंदिर असल्याचा अंदाज मंदिरांचे अभ्यासक प्रा. अनिल मुंगीकर यांनी व्यक्त केला.

Web Title: Hanuman with the big mustache in Chhatrapati Sambhajinagar, have you taken darshan?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.