साताऱ्यात दुसऱ्या दिवशीही हातोडा
By Admin | Updated: December 4, 2014 00:56 IST2014-12-04T00:24:09+5:302014-12-04T00:56:40+5:30
औरंगाबाद : सातारा- देवळाई नगर परिषदेच्या अतिक्रमण हटाव पथकाने दुसऱ्या दिवशी पार्किंग सोडून पाचव्या मजल्याच्या तयारीतील दोन बांधकामांवर हातोडा टाकला

साताऱ्यात दुसऱ्या दिवशीही हातोडा
औरंगाबाद : सातारा- देवळाई नगर परिषदेच्या अतिक्रमण हटाव पथकाने दुसऱ्या दिवशी पार्किंग सोडून पाचव्या मजल्याच्या तयारीतील दोन बांधकामांवर हातोडा टाकला. मनपाचे प्रशिक्षित अतिक्रमण हटाव पथक सातारा- देवळाई नगर परिषदेच्या मदतीला धावून गेले. साताऱ्यात ‘सिंघम’ प्रशासक विजय राऊत, मुख्याधिकारी अशोक कायंदे यांच्या टीमचा जोर वाढल्याने सलग दुसऱ्या दिवशीच्या कारवाईने बिल्डर व नागरिकांत घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. आज मनपाचे अतिक्रमण हटाव प्रमुख शिवाजी झनझन कारवाईत सहभागी झाले.
नगर परिषदेने ३१४ बांधकामधारकांना नोटिसा बजावल्या असून, एक महिन्याच्या कालावधीनंतरही त्याविषयी बांधकामधारकांनी पावले उचलली नाहीत. कारण ग्रामपंचायतीनेही बांधकामधारकांना विनापरवाना बांधकामासाठी नोटीस देऊन सूचना केल्या होत्या; परंतु त्या नोटिसांना संबंधितांनी जुमानले नाही. एक महिन्यानंतरही काय होणार म्हणून अक्षम्य दुर्लक्ष करीत बांधकामावर स्लॅब वाढत गेले. गट नं. ८० येथे संतोष बुरकूल यांनी कॉम्प्लेक्सचे काम सुरू केले. त्यांना नगर परिषदेने नोटीस देऊन महिन्याचा कालावधी उलटला असला तरी बांधकामाचा सपाटा सुरूच होता, तर शेख सलीम, शेख अयूब व नसीम खान या तिघांच्या गट नं. ९३ रणजितनगरमध्ये इमारती आहेत. बुरकूल व या तिघांच्या इमारतींचे दोन मजले पाडण्यात आले. नवीन बांधकाम सुरू असलेली १० कामे पहिल्या टप्प्यात टार्गेट केली असली तरी कोणते बांधकाम पाडणार याविषयी गुप्तता पाळली आहे.
एफएसआयचा नियम सातारा परिसरात बहुतांश नागरिकांनी पाळला आहे; पण अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांनी नियमांचे उल्लंघन केले आहे.
ग्रामपंचायतीकडून परवानगी
ग्रामपंचायतीकडून बांधकाम परवानगी घेतली हे मान्य; परंतु सिडकोच्या ना हरकत प्रमाणपत्राशिवाय बांधकामांना मंजुरीच देता येत नाही, असा नियम आहे. ग्रामपंचायतीच्या ना हरकतीच्या आधारे रजिस्ट्री करण्यात आलेली आहे. त्याच रजिस्ट्रीच्या आधारे घरांवर मजले चढवून ते सरळ विक्री केले जात आहेत.
खाजगी बँकांचे कर्ज प्रकरण करून बिल्डरांनी आपली पोळी भाजून घेतली. आता सामान्य नागरिकांनी रंगविलेली घराची स्वप्ने पत्त्याच्या बंगल्यासारखी ढासळून जात आहेत. बिल्डरला सुरुवातीची रक्कम भरून नागरिकांनी घर ताब्यात घेण्याचे प्रयत्न केले आहेत. घराचे बांधकाम एक चटई क्षेत्र (एफएसआय) आणि बांधकाम दुप्पट- तिप्पट असल्याचे ‘सिंघम’ विजय राऊत यांच्या निदर्शनास आले.