शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात अतिक्रमणांवर हातोडा; महापालिका आयुक्तांचे धाडसी पाऊल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2020 06:08 PM2020-03-04T18:08:37+5:302020-03-04T18:12:48+5:30

पैठणगेट, टिळकपथच्या व्यापाऱ्यांनी दिले होते निमंत्रण; पण पाडापाडी झाली कुंभारवाड्यात

Hammer on encroachments in Shiv Sena's ballekilla; Brave step of the Aurangabad Municipal Commissioner | शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात अतिक्रमणांवर हातोडा; महापालिका आयुक्तांचे धाडसी पाऊल

शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात अतिक्रमणांवर हातोडा; महापालिका आयुक्तांचे धाडसी पाऊल

googlenewsNext
ठळक मुद्देहातगाडी, फेरीवाल्यांना हुसकावण्याचा डावबोलावले एकाने, कारवाईचा बगडा दुसऱ्यांवरदहा-दहा फूट अतिक्रमणे जमीनदोस्तगुलमंडीवरही मोठमोठ्या अतिक्रमणांवर कारवाईदिवसभरात तब्बल १५० अतिक्रमणे काढली

औरंगाबाद : शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या गुलमंडी, कुंभारवाडा परिसरात महापालिकेच्या अतिक्रमण हटाव पथकाने मंगळवारी सकाळी अभुतपूर्व अशी कारवाई केली. रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी दहा-दहा फूट अतिक्रमणे हटविण्यात आली. महापालिका आयुक्त आस्तिककुमार पाण्डेय यांनी समोर उभे राहून कारवाईचा श्रीगणेशा केला. त्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली. गुलमंडी भागात ज्या व्यापाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केले आहे, ते स्वत:हून काढून घेण्यास त्यांनी सुरुवात केली. 

महापालिकेची ही मोहीम नियोजित नव्हती. पैठणगेट, टिळकपथ येथील व्यापाऱ्यांनी मनपा आयुक्त, पोलीस आयुक्तांना हातगाडी, फेरीवाल्यांचा बंदोबस्त करावा म्हणून निमंत्रित केले होते. व्यापाऱ्यांसोबत सकारात्मक चर्चा केल्यानंतर एका व्यापाऱ्याने कुंभारवाड्यातील अतिक्रमणांकडे अंगुलीनिर्देश केला. मनपा आयुक्तांनी जागेवर जाऊन वस्तुस्थितीची पाहणी केली. त्यानंतर अवघ्या दहा मिनिटांमध्येच कारवाईला सुरुवात करण्यात आली. पैठणगेट येथे पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद, मनपा आयुक्त आस्तिककुमार पाण्डेय यांनी व्यापाऱ्यांसोबत विविध प्रश्नांवर चर्चा केली. 
व्यापारी महासंघाचे अध्यक्ष जगन्नाथ काळे यांनी व्यापाऱ्यांच्या समस्या मांडल्या. पी-१, पी-२ पार्किंगची सोय करून द्यावी, रस्ता वन-वे असावा, हातगाड्या, फेरीवाल्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी करण्यात आली. पैठणगेट येथील मनपाच्या पार्किंगच्या जागेवर बहुमजली पार्किंगची इमारत बांधून देण्याचा प्रस्ताव व्यापारी महासंघाने मांडला. हा प्रस्ताव लेखी स्वरूपात द्यावा, अशी सूचना मनपा आयुक्तांनी केली. 

या सकारात्मक चर्चेनंतर एका व्यापाऱ्याने गुलमंडी, कुंभारवाड्यातील अतिक्रमणांकडे बोट दाखविले. त्यामुळे मनपा आयुक्त स्वत: वस्तुस्थिती पाहण्यासाठी कुंभारवाड्यात दाखल झाले. अरुंद रस्त्याची परिस्थिती पाहून क्षणभर आयुक्त अवाक् झाले. त्यांनी उपायुक्त रवींद्र निकम यांना फौजफाटा घेऊन बोलावले. बाराभाई ताजिया ते कुंभारवाडा कॉर्नरपर्यंत एका पथकाला अतिक्रमणे काढण्याचा आदेश दिला. 

दुसऱ्या पथकास औरंगपुरा भाजीमंडईपासून कुंभारवाड्यातील सर्व अतिक्रमणे काढण्यास सांगितले. मनपाच्या पथकाने क्षणार्धात पाडापाडीला सुरुवात केली. व्यापाऱ्यांना आपले साहित्य काढण्यासही वेळ मिळाला नाही. अवघ्या दहा ते पंधरा मिनिटांपर्यंत कुंभारवाड्यील सर्व दुकाने बंद झाली. मनपाच्या पथकाने रस्त्याच्या दोन्ही बाजूंना असलेले लोखंडी शेड, ओटे, पायऱ्या, पक्की बांधकामे पाडायला सुरुवात केली. अतिक्रमण हटाव मोहीम राबविताना मनपाला सिटीचौक पोलिसांचेही सहकार्य मिळाले. यावेळी पोलीस निरीक्षक संभाजी पवार कर्मचाऱ्यांसह उपस्थित होते. मनपाचे उपायुक्त रवींद्र निकम, पदनिर्देशित अधिकारी वसंत भोये, इमारत निरीक्षक आर.एस. राचतवार, मझहर अली, सागर श्रेष्ठ, पोलीस निरीक्षक फहीम हाश्मी, 
नागरी मित्र पथकाचे कर्मचारी उपस्थित होते. बुधवारी महापालिकेची अतिक्रमण हटाव मोहीम कोठून सुरू होणार याकडे व्यापाऱ्यांचे लक्ष लागले आहे. 


दूरसंचारचे पोलही काढले
कुंभारवाड्यात दूरसंचार विभागाचे आठ ते दहा लोखंडी पोल होते. यातील बहुतांश पोलवरून कनेक्शनही नव्हते. या पोलच्या पाठीमागे अनेक व्यापाऱ्यांनी अतिक्रमण केले होते. भविष्यात पुन्हा अतिक्रमणे होऊ नयेत, म्हणून मनपा आयुक्तांनी सर्व पोल काढण्याचे निर्देश दिले. दुपारी ३ वाजेपर्यंत आठपेक्षा अधिक पोल काढण्यात आले होते. अतिक्रमणे काढताना परिसरातील संपूर्ण वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता. विजेच्या तारांना लागूनच व्यापाऱ्यांनी मोठमोठे शेड टाकले होते. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना मनपाची नाली, गटार दिसेल तिथपर्यंत अतिक्रमणे काढा, अशी सूचना मनपा आयुक्तांनी वारंवार दिली.


मनाई आदेशही धुडकावून लावला
गुलमंडी पार्किंगसमोरील एका व्यापाऱ्याने रस्त्यावर आठ ते दहा फूट पक्के बांधकाम केलेले होते. मनपा आयुक्तांच्या निर्देशानुसार कारवाई सुरू होती. व्यापाऱ्याने माझ्याकडे मनाई आदेश असल्याचे आयुक्तांना सांगितले. त्याचे म्हणणे धुडकावून लावत आयुक्तांनी मी न्यायालयाचे बघून घेईन, असे म्हणत कारवाई केली. आयुक्तांचे हे रौद्ररूप पाहून व्यापाऱ्यांमध्ये आणखी खळबळ उडाली. सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत गुलमंडी, कुंभारवाडा भागातील १५० अतिक्रमणे काढल्याचे मनपाने प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. 

सेनेच्या विरोधात व्यापाऱ्यांचा रोष
गुलमंडी, कुंभारवाडा हा परिसर सेनेचा बालेकिल्ला, अशी ओळख आहे. कारवाई सुरू असताना एकही राजकीय नेता या भागात फिरकला नाही. सेनेचे काही कार्यकर्ते अत्यंत दूर उभे राहून फक्त कारवाईचा कानोसा घेत होते. सेनेच्या या भूमिकेविषयी व्यापाऱ्यांनी तीव्र शब्दांत रोषही व्यक्त केला. गुलमंडीपासूनच कारवाईला का सुरुवात केली? असा व्यापाऱ्यांचा प्रश्न होता.

टिळकपथच्या व्यापाऱ्यांवरही खापर
टिळकपथ, पैठणगेट भागातील मोजक्याच व्यापाऱ्यांनी महापालिका आयुक्त, पोलीस आयुक्तांना बोलावले. पण झाले उलटेच. फेरीवाले, हातगाड्यांवर आज कोणतीही कारवाई झाली नाही, उलट आमचेच मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे कुंभारवाड्यातील बहुतांश व्यापाऱ्यांचे म्हणणे होते.

पैठणगेटवर जेसीबी तैनात
व्यापारी रस्त्यावर पाच ते दहा फूट अतिक्रमण करतात. त्यांचादेखील बंदोबस्त केला जाणार आहे. वाहतूक शाखेच्या अधिकाऱ्यांसोबत महापालिका अधिकाऱ्यांचे पथक दिले जाणार आहे. हे पथक संयुक्तपणे दररोज पाहणी करील. कोणी रस्त्यावर अतिक्रमण केले, तर संबंधितावर दंडात्मक कारवाई केली जाईल. त्यानंतर जेसीबीने अतिक्रमण हटविले जाईल. त्यासाठी एक जेसीबी पैठणगेटवर तैनात ठेवला आहे, असे मनपा आयुक्तांनी सांगितले.

महापौर म्हणतात... विश्वासात घेतले नाही
महापौर नंदकुमार घोडेले यांनी मनपा आयुक्तांच्या कारवाईला विरोध तर केला नाही. उलट आयुक्तांनी कारवाई करण्यापूर्वी एकदा तरी महापौरांना विश्वासात घेणे आवश्यक होते, असे मत नोंदविले. एवढी मोठी कारवाई करण्यापूर्वी एकदा महापौरांना सांगायला हवे होते.


हातगाड्या लावण्यावर बंदी -मनपा आयुक्त
शहरातील मुख्य रस्त्यांवर हातगाड्या लावण्यास बंदी घातली जाणार आहे. हॉकर्स झोनचा निर्णय अंतिम होईपर्यंत पार्किंगच्या जागांचा वापर हॉकर्स झोन म्हणून केला जाणार असल्याचे मनपा आयुक्त आस्तिककुमार पाण्डेय यांनी सांगितले. मनपातर्फे लवकरच हॉकर्स झोन निश्चित केले जातील. मात्र, तोपर्यंत मुख्य बाजापेठेलगच्या पार्किंगच्या जागा हातगाडीचालकांना दिल्या जातील किंवा त्यांनी गल्लीबोळांत थांबण्यास हरकत नाही.

सोयीनुसार करणार कारवाई -पोलीस आयुक्त
व्यापाऱ्यांसोबत पैठणगेट येथे छोटेखानी बैठक घेण्यात आली. त्यानंतर पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद म्हणाले, व्यापाऱ्यांच्या अडचणी जाणून घेतल्या आहेत. पोलीस विभागाकडून सर्वतोपरी मदत करण्यात येईल. त्यासाठी लवकरच अधिकाऱ्यांची बैठक घेऊन योग्य तो निर्णय घेतला जाईल.

Web Title: Hammer on encroachments in Shiv Sena's ballekilla; Brave step of the Aurangabad Municipal Commissioner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.