आत्मविश्वास कॉँग्रेसला नडला हायुतीचे उमेदवार
By Admin | Updated: May 18, 2014 01:23 IST2014-05-18T01:03:02+5:302014-05-18T01:23:31+5:30
खा.रावसाहेब दानवे यांनी काँग्रेस आघाडीचे उमेदवार विलास औताडे यांच्यावर दोन लाखांहून अधिक मताधिक्यांनी विजय मिळवीत सलग चौथ्यांदा लोकसभा गाठली.

आत्मविश्वास कॉँग्रेसला नडला हायुतीचे उमेदवार
खा.रावसाहेब दानवे यांनी काँग्रेस आघाडीचे उमेदवार विलास औताडे यांच्यावर दोन लाखांहून अधिक मताधिक्यांनी विजय मिळवीत सलग चौथ्यांदा लोकसभा गाठली. सिल्लोड -सोयगाव तालुक्यातून खा.दानवे यांना २९ हजारांपेक्षाही जास्त मताधिक्य मिळाले. खा.दानवे यांना मताधिक्य मिळाल्याने भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये चांगलाच उत्साह संचारला असून, काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा हिरमोड झाला आहे. या निवडणुकीत प्रचाराची रणधुमाळी मागील निवडणुकींसारखी दिसून आली नव्हती. यामुळे सर्वच पक्षांचा प्रचार थंडावलेला दिसून आला. परंतु प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी मतदार स्वयंस्फूर्तीने मतदान करण्यासाठी मतदार उत्साही दिसून आले. यामुळे या निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढली. विशेषत: नरेंद्र मोदींच्या लाटेने तरुणांमध्ये मोठा उत्साह संचारलेला होता. गेल्या निवडणुकीत अवघ्या ८ हजार मतांनी खा.दानवे विजयी झाले होते. या निवडणुकीत त्यांच्याविरुद्ध मतदारांमध्ये नाराजीचा सूर असतानाही नरेंद्र मोदींच्या लाटेवर स्वार होत खा. दानवे यांनी दोन लाखांहून अधिक मतांनी विजय मिळवीत काँग्रेस आघाडीच्या उमेदवाराला चकवा दिला. महायुतीचे ऐक्य या निवडणुकीत माजी आ.सांडू पा.लोखंडे, साखर कारखान्याचे चेअरमन सुरेश बनकर, तालुकाध्यक्ष दिलीप दाणेकर, भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष इद्रीस मुलतानी, तालुकाध्यक्ष सुनील मिरकर, शिवसेना उपजिल्हाप्रमुख रघुनाथ चव्हाण, तालुकाप्रमुख किशोर अग्रवाल, जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र ठोंबरे, किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष मकरंद कोर्डे, जि.प.सदस्य ज्ञानेश्वर मोटे, हरिकिसन सुलताने आदी महायुतीच्या पदाधिकार्यांनी एकत्रित येऊन शिस्तबद्ध प्रचार, निवडणुकीची व्यूव्हरचना आखल्याने व ऐन निवडणुकीच्या प्रचारादरम्यान बाजार समितीचे सभापती श्रीरंग पा.साळवे यांनी आपल्या समर्थकांसह भाजपामध्ये प्रवेश केला. गेल्या निवडणुकीत सिल्लोड-सोयगाव तालुक्यात भाजपाचे आमदार होते. सिल्लोड-सोयगाव समिती युतीच्या ताब्यात होती. तरीदेखील काँग्रेस आघाडीच्या उमेदवाराला दीड हजार मतांचे मताधिक्य मिळाले होते. या निवडणुकीत सिल्लोड-सोयगाव तालुक्यात काँग्रेसचे आ.अब्दुल सत्तार यांची एक हाती सत्ता व सिल्लोड-सोयगाव पंचायत समित्या काँग्रेसच्या ताब्यात असतानादेखील महायुतीच्या उमेदवाराला अधिक मताधिक्य मिळाले. प्रचार सभेतून काँग्रेस आघाडीच्या उमेदवाराला ५० हजार मतांचे मताधिक्य देणार, असे आ.सत्तार यांनी सांगितले होते; परंतु मतदारांनी विकासाच्या गप्पा मारणार्या आ.सत्तार यांच्या विषयी असलेला रोष मतपेटीतून व्यक्त केला. मताधिक्याची नैतिक जबाबदारी आ.सत्तार यांनी स्वीकारून आमदारपदाचा राजीनामा द्यावा, असे भाजयुमो जिल्हाध्यक्ष इद्रीस मुलतानी यांनी सांगितले. या मतदारसंघातून आ. अब्दुल सत्तार हे आघाडीस भक्कम मताधिक्य मिळवून देतील, असे अपेक्षित होते. परंतु, त्या अपेक्षा फोल ठरल्या. महायुतीने मोदी लाटेवर पुन्हा एकदा मताधिक्य मिळविले. नगर पालिका निवडणुकीत आ. अब्दुल सत्तार यांनी एक हाती सत्ता मिळविली. त्या पार्श्वभूमीवर निवडणुका झाल्या. त्यामुळे काँग्रेसजनांचा आत्मविश्वास ऊंचावला होता परंतु तो फाजील ठरला. गेल्या निवडणुकीत या भागाने महायुतीस साथ दिली होती. याही वेळी भक्कम समर्थन दिले. तोच विषय आता विधानसभेत चिंतेचा ठरला आहे.