ग्रामस्थांनीच केली गुरूजीची नेमणूक
By Admin | Updated: December 30, 2014 01:16 IST2014-12-30T01:11:15+5:302014-12-30T01:16:08+5:30
लोहारा : पहिली ते पाचवीपर्यंतच्या वर्गासाठी केवळ मुख्याध्यापकासह अन्य एक शिक्षक कार्यरत असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होवू नये,

ग्रामस्थांनीच केली गुरूजीची नेमणूक
लोहारा : पहिली ते पाचवीपर्यंतच्या वर्गासाठी केवळ मुख्याध्यापकासह अन्य एक शिक्षक कार्यरत असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होवू नये, यासाठी माळेगाव ग्रामस्थांनी मानधन तत्वावर एका डी.एड. झालेल्या भावी गुरुजीची नेमणूक केली आहे. त्यांचे मानधनही वर्गणी गोळा करून देण्याचा निर्णय ग्रामस्थांच्या बैठकीत घेण्यात आला.
लोहारा तालुक्यातील माळेगाव येथे जिल्हा परिषदेची पहिली ते पाचवीपर्यंत प्राथमिक शाळा आहे. यामध्ये ६२ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यासाठी मुख्याध्यापक व्ही. बी. नन्नवरे आणि ए. एम. ढोबळे हे दोघेच पाच वर्गांसाठी अध्यायपनाचे काम करतात. त्यात मुख्याध्यापकांना कार्यालयीन काम, बैठका आदींमुळे अनेकवेळा बाहेर जावे लागते. त्यामुळे केवळ एकाच शिक्षकाला पाचही वर्गाचा भार उचलावा लागतो. परिणामी विद्यार्थ्यांचे शैैक्षणिक नुकसान होत आहे.
या ठिकाणी शिक्षकाची नियुक्ती करण्याबाबत वारंवार पाठपुरावा करण्यात येत आहे. शिवाय महिन्याभरापूर्वी याच मागणीसाठी शाळाही बंद ठेवण्यात आली होती. परंतु, पटसंख्येचे कारण देत शिक्षण विभागाकडून येथे शिक्षकाची नियुक्ती करण्यात आली नाही. शिक्षक नियुक्तीकडे दुर्लक्ष होत असल्याने अखेर ग्रामस्थांनीच यावर तोडगा काढत गावातील एका डीएड झालेल्या तरूणास या ठिकाणी मानधन तत्वावर शिक्षक म्हणून नियुक्त करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार एक बैठक बोलावून सर्वांच्या संमतीने मुकेश भोकरे यांची येथे नियुक्ती करण्यात आली. भोकरे यांना दरमहा तीन हजार रूपये मानधन देण्याचा निर्णय बैठकीत झाला असून, यासाठी लोकवर्गणी गोळा करण्यात येणार आहे. (वार्ताहर)