जीएसटी कमी पण किराणा दुकानदार जुन्या दरातच विकताहेत वस्तू; ग्राहक-व्यापाऱ्यात चकमकी
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2025 19:16 IST2025-09-23T19:15:33+5:302025-09-23T19:16:20+5:30
किराणा व्यापारी जुन्या किमतीतच वस्तू विकत होते. यामुळे काही ठिकाणी ग्राहक व व्यापाऱ्यांमध्ये वाद झाले.

जीएसटी कमी पण किराणा दुकानदार जुन्या दरातच विकताहेत वस्तू; ग्राहक-व्यापाऱ्यात चकमकी
छत्रपती संभाजीनगर : जीएसटी दर कमी झाल्याने घराच्या आसपासच्या किराणा दुकानात टूथब्रशपासून ते ब्रँडेड गावरान तुपापर्यंतच्या असंख्य वस्तू खरेदीसाठी गेलेल्या ग्राहकांच्या पदरी निराशा आली. कारण, किराणा व्यापारी जुन्या किमतीतच वस्तू विकत होते. यामुळे काही ठिकाणी ग्राहक व व्यापाऱ्यांमध्ये वाद झाले. मात्र वितरक, मॉल, सुपर शॉपींनी त्यांच्याकडील जुन्या वस्तूही कमी झालेल्या किमतीत विकण्यास सुरुवात केली. त्यामुळे ग्राहकांना किंचित समाधान मिळाले.
किराणा दुकानातील ब्रँडेड ५४ वस्तूंवरील जीएसटी ५ टक्के तर कुठे शून्य टक्के करण्यात आला. मात्र, याचा फायदा सोमवारी ग्राहकांना मिळाला नाही. ‘आम्ही जास्त दरातील जीएसटी भरून माल खरेदी केला आहे. यामुळे आम्ही त्याच किमतीत माल विकणार. नवीन उत्पादनात कंपन्या कमी एमआरपी करतील, तो माल आल्यावर आम्ही नवीन दरात विकू’, असे दुकानदार ग्राहकांना सांगत होते. तर ‘जेव्हा भाव वाढतात तेव्हा तुम्ही लगेच किमती वाढवतात, आता भाव कमी झाल्यावर किमती कमी का करत नाही’, असा सवाल ग्राहक व्यापाऱ्यांना विचारत होते. मात्र, किराणा वगळता औषधी, इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे व वाहनांच्या किमती कमी झाल्या. काहींनी जुनी व नवीन किमतीची यादी समोर ठेवली होती. यामुळे नवरात्रोत्सवाच्या पहिल्या दिवशीपासूनच शोरुममध्ये गर्दी दिसली.
नवीन दरातच जुन्या वस्तू विका
किराणा साहित्यात ५४ ब्रँडेड वस्तूवरील जीएसटी कमी झाला आहे. वितरकांनी लगेच पहिल्या दिवशी कमी झालेल्या नवीन दरातच माल विक्री करणे सुरु केले. किती टक्के वस्तूंचे भाव कमी झाले, याचे फलक काही व्यापाऱ्यांनी दुकानासमोर लावले. मात्र, काही दुकानदार जुन्या दरातच माल विकत आहेत. त्या व्यापाऱ्यांनी जुन्या वस्तूही नवीन कमी झालेल्या किमतीत विकाव्यात. नंतर जीएसटी रिटर्न भरताना त्यांना किमतीमधील तफावत मिळेल.
- संजयकुमार कांकरिया, अध्यक्ष, जिल्हा व्यापारी महासंघ
नवीन वस्तू नवीन दरात विक्री होतील
अनेक किराणा व्यापारी असे आहेत की, त्यांची जीएसटी प्रणालीत नोंदणी नाही. असे किराणा व्यापारीच जुन्या किमतीत जुना माल विकत आहेत. नवीन उत्पादने येतील, त्यावर नवीन किंमत असेल. तेव्हाच ग्राहकांना जीएसटी कमी झाल्याचा फायदा मिळेल.
- लक्ष्मीनारायण राठी, उपाध्यक्ष, जिल्हा व्यापारी महासंघ