परमपावन दलाई लामांना अभिवादन

By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2019 03:04 AM2019-11-24T03:04:28+5:302019-11-24T03:04:44+5:30

अवघ्या विश्वाचे छप्पर असलेल्या शांती व अहिंसाप्रिय देशावर शेजारच्या बलाढ्य चीन देशाने आक्रमण करून साठ लाख लोकसंख्येवर परवशतेचे पाश आवळले.

Greetings to His Holiness the Dalai Lama | परमपावन दलाई लामांना अभिवादन

परमपावन दलाई लामांना अभिवादन

googlenewsNext

- प्रा. डॉ. भाऊ लोखंडे

अवघ्या विश्वाचे छप्पर असलेल्या शांती व अहिंसाप्रिय देशावर शेजारच्या बलाढ्य चीन देशाने आक्रमण करून साठ लाख लोकसंख्येवर परवशतेचे पाश आवळले. या बौद्ध धर्मीय देशाचे धर्मप्रमुख व राष्ट्रप्रमुख म्हणून परमपावन दलाई लामांचा पराकोटीचा सन्मान व पूजा केली जाते. ते स्वत:ला एक साधा बौद्ध भिक्षू म्हणतात. परंतु जनता मात्र त्यांना तिबेटी भाषेत ‘येशी नोरबू’ म्हणजे मनोकामना पूर्ण करणारा चिंतामणी’ म्हणतात. ‘दलाई लामा’ या मंगोल संज्ञेचा अर्थ ‘ज्ञान प्रज्ञेचा सागर’ असा होतो. त्यांना अवलौकितेश्वरा (चेन-रेजी) चा साक्षात अवतार किंवा कारुण्य सिंधू मानतात.

रदार, देश, राज्य हिरावून निर्वासितांचे जगणे वाट्याला आले तरी त्यांच्या चर्येवरील तेज, शांती व संयम ढळला नाही. त्यांनी तिबेटी बांधवांना भारतात कृतज्ञपणे सन्मानाने जगायला शिकवले. कमी उत्पन्नात, कमी खर्चाचा व गरजांचा मेळ बसवून समाधानाने धर्माचरण करीत जगायला शिकवले. त्यांच्या ऐतिहासिक ‘न भूतो न भविष्यती’ अशा विश्वशांतीच्या कार्याचा गौरव मानाचा मुजरा करण्यासाठी जेव्हा दलाई लामांना ‘नोबेल पुरस्कार’ देण्यात आला तेव्हा ते निरपेक्ष शांतपणे म्हणाले, ‘या पुरस्कारामुळे माझा अहिंसक आंदोलनावर अधिक विश्वास बळावला. या पुरस्काराची राशी मी जगात अन्नाविना जगणाऱ्या असहाय उपाशी लोकांसाठी खर्च करायला देईन. माझ्या तिबेटी लोकांना पैशाची गरज नाही, असे नाही; परंतु जगाच्या पाठीवर कुणीही तिबेटी उपाशी झोपत नाही. म्हणून मी ही राशी जगातील अभावग्रस्त गरीब दु:खितांसाठी उपयोगात आणीन. यावरून ‘न त्वमहं राज्यं न स्वर्ग न पुनर्भवम्। काम ये दु:खतप्चांना प्राणिनां अर्तविनाशनम्।

या राज्य, स्वर्ग, पुनर्जन्म नाकारून दु:खपीडित प्राण्यांच्या दु:खाचा विनाश अपेक्षिणाºया करुणेच्या सागराच्या बोधिसत्त्वाच्या मंगलमैत्रीचा अनुभव येतो. भारताने दलाई लामांना देऊन तिबेटी व जगातील मानवताप्रेमी जनतेची सहानुभूती व शाबासकी मिळविली. ब्रिटिशांच्या राज्यात तिबेट हे बफरस्टेट होते. चीन व भारताच्या सैन्यतुकड्या तिबेटमध्ये ठेवल्या जात. त्यामुळे भारताच्या सीमा सुरक्षित होत्या; परंतु हिंदी चिनी भाई-भाई म्हणत माओ व चाऊ एन लाईनने भारताला धोका देण्यासाठी ‘पंचशीला’चा वापर केला आणि तिबेटवर चीनचे सार्वभौमत्व प्रस्थापित झाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर संसदेत धोक्याचा इशारा देत म्हणाले होते ‘भारत सरकारने तिबेटवर चीनचे सार्वभौमत्व मान्य करून घोडचूक केली. तिबेटला बफरस्टेटच राहू द्यायला पाहिजे होते; परंतु आता भारताच्या सीमेबरोबर चीनची सीमा जोडली गेली. चीनचा इतिहास हा आक्रमणाचा इतिहास  आहे.

भारताने खºया अर्थाने शांती, अहिंसा, धर्मसहिष्णुता, बंधुभावाची उदात्त मूल्ये बुद्धगयेतून जगाला दिली आहेत. त्यांचा परमपावन दलाई लामा आपल्या अमृतवाणीने पुनरुच्चार व प्रबोधन करून भारतात समता, स्वातंत्र्य व बंधुतेचा संदेश देऊन उपकृत करतील, अशी अपेक्षा व आकांक्षा आहे. या ग्लोबल परिषदेतून ‘सर्वधर्म सहिष्णुता व मानवतेचा जयजयकार हाईल आणि सब्बे सत्ता सुखी होन्तू। मा कंचि दु:खमागमा’ या पसायदानाबरोबर राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा हा मंगलमैत्रीचा संदेश गगनात निनादेल अशी मंगलकामना आहे.
(लेखक हे प्रसिद्ध बौद्ध विद्वान व
आंबेडकरी विचारवंत आहेत.)

Web Title: Greetings to His Holiness the Dalai Lama

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.