युवा पिढीकडून लैंगिक शिक्षणाला हिरवा कंदील
By Admin | Updated: July 2, 2014 00:30 IST2014-07-02T00:01:36+5:302014-07-02T00:30:11+5:30
नांदेड : बालक असो की युवा वर्ग, त्यांच्यापर्यंत अजूनही शास्त्रशुद्ध पद्धतीने लैंगिक शिक्षणाची माहिती पोहचत नाही़

युवा पिढीकडून लैंगिक शिक्षणाला हिरवा कंदील
नांदेड : बालक असो की युवा वर्ग, त्यांच्यापर्यंत अजूनही शास्त्रशुद्ध पद्धतीने लैंगिक शिक्षणाची माहिती पोहचत नाही़ तब्बल ८२ टक्के युवकांना मित्रच ती माहिती पुरवितात़ ६२ टक्के युवक इंटरनेटची मदत घेतात़ तर ३२ टक्के पुस्तके चाळतात़ त्यामुळेच वैद्यकीय तज्ज्ञ अन् सामाजिक कार्यकर्ते शास्त्रशुद्ध पद्धतीने शालेय व महाविद्यालयीन युवकांना लैंगिक शिक्षण दिले जावे याचा आग्रह धरत आहेत़
केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ़हर्षवर्धन यांनी लैंगिक शिक्षणाला विरोध दर्शविणारे वक्तव्य केले होते़ त्यानंतर पुन्हा एकदा या विषयावर मंथन सुरू झाले आहे़ त्याचाच एक भाग म्हणून महाविद्यालयातील युवक-युवतींकडून प्रश्नावलीद्वारे सर्व्हेक्षण करण्यात आले़ शाळा, महाविद्यालयात लैंगिक शिक्षण दिले जावे, याबद्दल जवळपास ७४ टक्के तरूण-तरूणींनी सहमती दर्शविली आहे़ त्यामध्ये ४२ टक्के मुले आणि ३२ टक्के मुलींची सहमती आहे़ तर २६ टक्के विरोध दर्शवितात़ पैकी ८ टक्के मुले तर १८ टक्के मुलींचा विरोध आहे़
आश्चर्य म्हणजे लैंगिक शिक्षणाची खुलेपणाने चर्चा व्हावी, असे वातावरण शाळा-महाविद्यालयात असत नाही, असे ७८ टक्के तरूण-तरूणींना वाटते़ याउलट २२ टक्के युवक-युवतींना शाळा-महाविद्यालयात योग्य वातावरण आहे, असे वाटते़
लैंगिक विषयावरील माहिती मिळविण्यासाठी मित्रांना जवळ करणारा वर्ग अधिक आहे़ केवळ १२ टक्के मुले-मुली आपल्या पालकांशी बोलू शकतात़ तर ८८ टक्के जणांचा पालकांशी संवाद होत नाही़
एकीकडे पालकांनी आपल्या मुलांशी मोकळेपणाने चर्चा करावी, असे असताना प्रत्यक्षात मात्र ८२ टक्के पालक आपल्या मुला-मुलींशी लैंगिक शिक्षणावर उघडपणे बोलत नाहीत़ केवळ १८ टक्के पालक बोलतात, असे मुलांनी सांगितले आहे़ लैंगिक शिक्षण शाळा-महाविद्यालयातून दिले जावे असा आग्रह धरणारी तरूण पिढी निश्चितच केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ़ हर्षवर्धन यांच्या मताशी सहमत दिसत नाही़ जवळपास ८० टक्के तरूण-तरूणींना आरोग्यमंत्र्यांनी लैंगिक शिक्षणाला विरोध दर्शविणारे केलेले वक्तव्य अयोग्य वाटले आहे़ महाविद्यालयीन मुले-मुली आक्षेपार्ह वेबसाईट वा साहित्य वाचतात का, याबाबत ४८ टक्के मुलांनी होय असेच उत्तर दिले़ त्यात १७ टक्के मुलींनी सुद्धा होकारार्थी उत्तर दिले आहे़ तसेच आक्षेपार्ह साहित्य वाचण्यासाठी ६२ टक्के युवक-युवतींना वाटते इंटरनेटचा वापर होतो, तर ३२ टक्के युवक-युवतींना वाटते पुस्तकेच उपयोगात आणली जातात़ तर ६ टक्के मुलांनी तटस्थ राहणे पसंत केले़ एकंदर लैंगिक शिक्षणाबद्दल युवा पिढी आग्रही असल्याचे सर्व्हेक्षणाद्वारे स्पष्ट झाले आहे़ अजूनही मुला-मुलींसमोर या विषयाचे सर्व्हेक्षण हासुद्धा दडपणाचा विषय असल्याचे जाणवले़ सर्व्हेक्षणावर नाव तसेच ओळख नमुद करायची नसल्यामुळे उघडपणे मुलींनी आपली मते नोंदविली़ त्याचवेळी हा विषय अजूनही उघडपणे बोललो तर मित्र-मैत्रिणी काय म्हणतील, वडील मंडळी नावे ठेवतील, अशीच भावना सर्व्हेक्षण फॉर्म भरुन देणाऱ्या बहुतांश युवक-युवतींची दिसून आली़ मात्र कुठेतरी हा विषय उघडपणे शिकविला जावा, अशी सुप्त इच्छा युवा वर्गाची दिसून आली़ (प्रतिनिधी)
आई सजग
लैंगिक शिक्षणावर ८२ टक्के पालक आपल्या मुलांशी मोकळेपणाने बोलत नाहीत़ मात्र १८ टक्के पालक मुलांशी बोलतात, हाच काय तो आशेचा किरण़ त्यातही ३ टक्के मुलांनाच असे वाटते की पालक मुलांशी बोलतात़ तर १५ टक्के पालक मुलींशी बोलतात, यावर मुलींनी होकारार्थी उत्तर दिले आहे़ म्हणजेच मुलांपेक्षा मुलींशी पालकांचा संवाद अधिक आहे़ पर्यायाने आई मुलींशी मोकळेपणाने चर्चा करते, ही बाब सर्व्हेक्षणातून समोर आली आहे़
बालकांची उत्तरे टाळू नका, तरूणांना विश्वासात घ्या
बालकांनी विचारलेल्या प्रश्नांना टाळू नका़ चुकीची, अशास्त्रीय उत्तरे तर अजिबात देऊ नका़ आवश्यकता असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या़ तर किशोरवयीन मुला-मुलींच्या मनात निर्माण होणाऱ्या प्रेम, लैंगिक भावना या नैसर्गिक आहेत़ त्यांची जिज्ञासा कायम ठेवून उत्तरे द्यावीत़ युवक-युवतींना तर महाविद्यालयांमधून विविध कार्यशाळा व उपक्रमांमधून माहिती दिली पाहिजे़ ज्यामुळे अशास्त्रीय मार्गाकडे युवापिढी वळणार नाही़ परिणामी अभ्यास, व्यक्तिमत्त्व विकास, विविध खेळ, सांस्कृतिक नैपुण्य तसेच त्यांच्या आवडीच्या विषयांकडे अधिक लक्ष वळविणे शक्य होईल़
- डॉ़अशोक बेलखोडे (सामाजिक कार्यकर्ते)