छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यातील २१ लाख ९७ हजार २११ पैकी ५५ हजार ३३४ महिलांचे लाडकी बहीण योजनेचे अर्ज रद्द होणार आहेत, तर ५४ हजार ५९८ अर्ज अजून मान्यच झाले नसून, त्यांना अनुदान केव्हा मिळणार हे अद्याप स्पष्ट नाही. मराठवाड्यातील ५५ हजार ३३४ महिलांना लाडकी बहीण योजनेचा आठवा हप्ता मिळणार नाही.
विभागातील सर्व जिल्ह्यातील संजय गांधी योजनेतील महिला लाभार्थी, शेतकरी सन्मान योजनेचा लाभ घेणाऱ्या लाभार्थी व इतर योजनांचा लाभ घेणाऱ्या महिला लाभार्थ्यांची माहिती संकलित करणे सुरू असल्याचे विभागीय आयुक्तालयातील सूत्रांनी सांगितले. विभागातून २३ लाख ७ हजार १८४ महिलांनी योजनेसाठी अर्ज केले होते. त्यातील २१ लाख ९७ हजार २११ अर्ज वैध ठरले. ५४ हजार ५९८ अर्ज अद्याप मंजूर केलेले नाहीत.
सुमारे ५८ कोटी दिले...अर्ज रद्द झालेल्या ५५ हजार ३३४ महिलांना आजवर ५० ते ६० कोटींदरम्यान अनुदान जुलै २०२४ ते जानेवारी २०२५ या काळात बँक खात्यावर दिले आहेत. ही रक्कम वसूल केली जाणार नाही, असे शासन सांगत आहे. परंतु, पुढच्या महिन्यांत कॅगच्या चौकशीत राज्यातील सर्व विभागांचा आर्थिक ताळेबंद होत असताना ही रक्कम कुठून वसूल करणार, असा प्रश्न शासनाला पडू शकतो. त्यामुळे प्रशासकीय यंत्रणा प्रचंड धास्तावलेली आहे.
यांना मिळणार नाही लाभ...विविध सरकारी योजनांचा लाभ घेणाऱ्या, ज्यांचे उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त आहे, अशा महिलांना लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात येत आहे. महिलांचे उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त आहे की नाही, हे शोधून काढण्यासाठी प्राप्तिकर विभागाची मदतही घेण्यात येणार आहे.
बँकेत ई-केवायसी द्यावे लागणारआता नव्या नियमानुसार लाभार्थी महिलांना बँकेत दरवर्षी जून-जुलै महिन्यांत ई-केवायसी सादर करावे लागेल. तसेच हयातीचा दाखलादेखील महिलांना द्यावा लागेल. यानंतरच लाडकी बहीण योजनेचे पैसे बँक खात्यात येतील. शेतकरी सन्मान योजनेतून एक हजार रुपयांचा लाभ घेणाऱ्या महिलांना ५०० रुपये लाडकी बहीण योजनेतून दिले जातील. तसेच निराधार योजनेचा लाभ मिळणाऱ्या महिलांनादेखील योजनेचा लाभ मिळणार नाही.
जिल्हा.......................यांचे अनुदान बंदछत्रपती संभाजीनगर......६६५५धाराशिव..................२५३३लातूर......................८००१जालना.....................९६२२हिंगोली.....................५८२५परभणी...................२८०२बीड.......................९३६४नांदेड .....................१०५३२एकूण........................५५३३४