ग्रामसेवकास घेराव
By Admin | Updated: August 17, 2014 00:18 IST2014-08-17T00:18:12+5:302014-08-17T00:18:12+5:30
ग्रामसेवकास गावातील महिला व पुरूषांनी ग्रा.पं. कार्यालयात दोन तास ठेऊन घेराव घातला होता.

ग्रामसेवकास घेराव
शिरडशहापूर : औंढा नागनाथ तालुक्यातील सारंगवाडी येथे १५ आॅगस्ट रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास तंटामुक्ती समितीच्या अध्यक्ष निवड प्रक्रियेदरम्यान ग्रामसेवकाने चुकीच्या पध्दतीने मोजणी केल्यामुळे गावात दोन गटात तणाव निर्माण झाला. यावेळी ग्रामसेवकास गावातील महिला व पुरूषांनी ग्रा.पं. कार्यालयात दोन तास ठेऊन घेराव घातला होता. पोलिसांच्या मध्यस्थीने हा तणाव निवळला.
सारंगवाडी येथील ग्रा.पं. कार्यालयात शुक्रवारी सकाळी ग्रामसभा घेण्यात आली. ग्रामसभेतून तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षाची निवड करण्यासाठी सारंगवाडी व गवलेवाडी येथील महिला व पुरूष मोठ्या संख्येने उपस्थित होते. अध्यक्षपदासाठी लिंबाजी कुरूडे, शामराव कुरूडे यांचे नाव सुचविण्यात आले. दोघांमध्ये एकमत होत नसल्यामुळे हात उंचावून निवडणूक घेण्यात आली. यामध्ये लिंबाजी कुरूडे यांना ३७५ मते पडली तर शामराव कुरूडे यांना २८८ मते पडली; परंतु मतमोजणी करत असताना ग्रामसेवकांनी शामराव कुरूडे यांना जास्त मतांची मोजणी केल्यामुळे शामराव कुरूडे यांच्या कार्यकर्त्यांनी गुलाल उधळून फटाके फोडले व नंतर ग्रामसेवकाने लिंबाजी कुरूडे यांना जास्त मते मिळाल्याचे घोषीत केल्यामुळे तेथील महिलांनी ग्रामसेवक विश्वनाथ बिच्चेवार यांना घेराव घालून डांबून ठेवले.
यावेळी गावात तणाव सदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. पोलिसांनी जमावाला शांत करुन परिस्थिती नियंत्रणात आणल्यामुळे मोठा अनर्थ टळला. (वार्ताहर)