शासनाचे ३ कोटींचे नुकसान; निलंबित उपजिल्हाधिकारी खिरोळकरांना वसूलीची नोटीस बजावणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2025 19:22 IST2025-09-10T19:18:31+5:302025-09-10T19:22:59+5:30
१५ महिन्यांच्या कार्यकाळात त्यांनी ८४ प्रकरणे हाताळली. त्यातील काही प्रकरणात शासनाचे नजराणा शुल्क कमी भरून घेतले.

शासनाचे ३ कोटींचे नुकसान; निलंबित उपजिल्हाधिकारी खिरोळकरांना वसूलीची नोटीस बजावणार
छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यातील वर्ग २ मधील जमिनी वर्ग १ मध्ये करण्याचा सपाटा निलंबित निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर यांनी लावल्याचे चौकशीअंती उघडकीस आले. १५ महिन्यांच्या कार्यकाळात त्यांनी ८४ प्रकरणे हाताळली. त्यातील काही प्रकरणात शासनाचे नजराणा शुल्क कमी भरून घेतले. यात शासनाचे सुमारे ३ कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा ठपका चौकशी समितीने ठेवला. तीन महिन्यानंतर चौकशी समितीने जिल्हाधिकाऱ्यांना अहवाल सादर केला. खिरोळकरांना भरपाईसाठी जिल्हा प्रशासन नोटीस बजावणार आहे. ८४ पैकी काही संचिकांमध्ये लहान-मोठ्या अनियमितता आढळून आल्या आहेत.
तीसगाव येथील वर्ग- २ ची जमीन वर्ग १ मध्ये बदलण्यासाठी तब्बल २३ लाख रुपयांची लाच मागितल्याच्या प्रकरणात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने २७ मे रोजी तत्कालीन निवासी उपजिल्हाधिकारी खिरोळकर आणि महसूल सहायक दीपक त्रिभुवन या दोघांना अटक केली होती. यानंतर खिरोळकर आणि त्रिभुवन यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. त्यांनी पदावर असताना १५ महिन्यांत मंजूर केलेल्या सर्व प्रकरणांची चौकशी करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी घेतला. त्यानुसार अपर जिल्हाधिकारी संभाजीराव अडकुणे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्त केली होती.
नोटीस बजावण्यात येईल
चौकशी समितीचा अहवाल मिळाला आहे. तीन प्रकरणांत जुन्या दरानुसार नजराणा घेतल्यामुळे शासनाचे नुकसान झाल्याचा ठपका आहे. त्यामुळे संबंधितांना नोटीस बजावण्यात येईल.
- दिलीप चव्हाण, जिल्हाधिकारी
१५० संचिका पाईपलाईनमध्ये
अब्दीमंडीमध्ये उत्तमरीत्या संचिका हाताळणाऱ्या एका लिपिकाकडे १५० हून अधिक वर्ग २ मधून वर्ग १ मध्ये बदल करण्यासाठी आलेल्या प्रस्तावाच्या संचिका आहेत. तो लिपिक सध्या ग्रामीण तहसीलमध्ये कार्यरत आहे. त्याची बदली दुसऱ्या विभागात असताना त्याला तेथे बसविले आहे. प्रत्येक संचिकेचा नजराणा मिळाल्यानंतरच तो लिपिक प्रस्ताव तयार करून वरिष्ठांकडे पाठवित असल्याची चर्चा आहे. एका मंत्र्याने शिफारस करून त्या लिपिकाची बदली गृह शाखेत करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना सुचविले होते. परंतु अब्दीमंडीतील उत्तम कामगिरीमुळे त्याची बदली रोखली गेली.