माफियांनी पोखरल्या सरकारी जमिनी
By Admin | Updated: July 21, 2014 00:22 IST2014-07-20T23:32:31+5:302014-07-21T00:22:50+5:30
चेतन धनुरे , लातूर स्वत:च्या मालकीच्या जमिनीतून परवानगीशिवाय केलेले उत्खनन हे कायद्यानुसार चोरीच ठरते़ असे असतानाही जिल्ह्यात अनेकांनी गौण खनिजांची मोठ्या प्रमाणात चोरी केली़

माफियांनी पोखरल्या सरकारी जमिनी
चेतन धनुरे , लातूर
स्वत:च्या मालकीच्या जमिनीतून परवानगीशिवाय केलेले उत्खनन हे कायद्यानुसार चोरीच ठरते़ असे असतानाही जिल्ह्यात अनेकांनी गौण खनिजांची मोठ्या प्रमाणात चोरी केली़ हे प्रकार केवळ खाजगी जमिनीतच सुरु आहेत, असे नाही तर सरकारी जमिनींनाही खाणमाफियांनी सुरुंग लावला आहे़ ठिकठिकाणच्या गायरान जमिनी तसेच वन विभागाच्या ताब्यात असलेल्या जमिनींवरही प्रचंड उत्खनन करुन गौण खनिजांची चोरी झाली़ तरीही जबाबदार ‘सरकारी बाबू’ मात्र डोळ्यावर पट्टी ओढून बसले़
जमीन खाजगी असली तरी संबंधिताची त्यावर केवळ ३ फुटापर्यंत मालकी असते़ जमिनीपासून ३ फुटापेक्षा जास्त खाली खोदकाम झाल्यास त्यातून मिळणाऱ्या प्रत्येक खनिज, वस्तूवर सरकारी मालकी असते़ त्यानुसार जिल्ह्यातील ९१ लणांनी परवानगी घेऊन गौण खनिजाचा उपसा केला़ तर अनेकांनी विनापरवानाच गौण खनिज उपसले़ हे उत्खनन केवळ खाजगी जमिनीपुरतेच मर्यादित राहिले नाही़ अगदी सरकारी जमिनीतही उत्खनन करुन गौण खनिजाची चोरी करण्याचे धाडस खाणमाफियांनी केले आहे़ अहमदपूर तालुक्यात घडलेला हा प्रकार भास्कर लहाने या आरटीआय तथा सामाजिक कार्यकर्त्याने समोर आणला आहे़ या भागातील सोरा व लांजी येथील महसूलच्या ताब्यात असलेल्या गायरान जमिनीत मोठे उत्खनन झाले आहे़ सोरा येथील गट क्रमांक ६९ मध्ये असलेल्या जमिनीत तसेच अगदी पाझर तलावातूनही गौण खनिजाची चोरी करण्यात आली आहे़ लांजी येथील गट क्रमांक ५७, ५८ मधील गायरान जमिनीतही उत्खनन करण्यात आले आहे़
भास्कर लहाने यांनी माहितीच्या अधिकारात काढलेल्या माहितीत अहमदपूरच्या तहसीलदारांनी तालुक्यात एकही अवैध खाणपट्टा नसल्याचे म्हटले होते़ यावर्षी महसूल विभागानेच २ खाणपट्टे शोधून काढले आहेत़ इतकेच नव्हे, तर लहाने यांनी माहिती अधिकारातच मिळविलेल्या तहसीलदारांच्या वाहनाच्या लॉग बुकमध्ये २००५ ते अलीकडच्या काळापर्यंत तत्कालीन वेगवेगळ्या तहसीलदारांनी अनेकवेळा रॉयल्टी वसुलीसाठी असे कारण दर्शवून सोरा, लांजी येथे दौरा केला होता़ याठिकाणी अवैध खाण नसल्याचे सांगणाऱ्या तहसीलदारांनी मग सोरा, लांजीत कशाची रॉयल्टी वसूल केली, असा प्रश्नही उपस्थित होत आहे़ अहमदपूर तालुक्यातील सरकारी जमिनीतून झालेल्या गौण खनिजाच्या चोरीचे हे उदाहरणादाखल नमुने आहेत़ याशिवाय गंडी घाटातील वन विभागाच्या ताब्यातील जमिनीतही बऱ्याच ठिकाणी खोदकाम झालेले आहे़ जिल्हाभरातच ही परिस्थिती दिसून येत आहे़
गौण खनिज चोरीस अधिकारी जबाबदाऱ़़
गौण खनिजाचे उत्खनन देशभरातील जवळपास प्रत्येक जिल्ह्यात होते़ त्याच्या उत्खननाचे अचूक मोजमाप करुन आकडा काढल्यास तो कोळसा घोटाळ्यापेक्षाही मोठा निघेल़ महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनीच त्या-त्या वेळी माफियांना अभय दिल्याने अवैध उत्खनन मोठ्या प्रमाणात झाले आहे़ शासकीय मालमत्तेचे रक्षण करण्याची जबाबदारी असणाऱ्या अधिकाऱ्यांनीच त्याकडे डोळेझाक केल्याने हा प्रकार घडला़ त्यामुळे गौण खनिज चोरीस त्यांना जबाबदार धरुन तत्कालीन महसूल अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल व्हावेत, अशी आपली मागणी आहे़ यासंदर्भात कार्यवाही न झाल्यास आपण न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचे माहिती अधिकार तथा सामाजिक कार्यकर्ते भास्कर लहाने म्हणाले़