सरकारी कर्मचाऱ्यांनी केले पोस्टल मतदान
By Admin | Updated: October 9, 2014 00:49 IST2014-10-09T00:44:57+5:302014-10-09T00:49:20+5:30
औरंगाबाद : मतदानाच्या दिवशी औरंगाबाद मध्य मतदारसंघात निवडणूक कर्तव्यावर राहणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांनी बुधवारीच आपला मतदानाचा हक्क बजावला.

सरकारी कर्मचाऱ्यांनी केले पोस्टल मतदान
औरंगाबाद : मतदानाच्या दिवशी औरंगाबाद मध्य मतदारसंघात निवडणूक कर्तव्यावर राहणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांनी बुधवारीच आपला मतदानाचा हक्क बजावला. या मतदानासाठी मतपत्रिकांचा वापर करण्यात आला.
विधानसभेसाठी राज्यात १५ आॅक्टोबर रोजी मतदान होणार आहे. जिल्ह्यातील नऊ मतदारसंघांतील एकूण २७४७ केंद्रांवर मतदानाची प्रक्रिया राबविली जाणार आहे. त्यासाठी जिल्ह्यात १६ हजार ८०० कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. या कर्मचाऱ्यांना विधानसभा मतदारसंघनिहाय प्रशिक्षण दिले जात आहे.
औरंगाबाद मध्य मतदारसंघात १७०० कर्मचारी लागणार असून या कर्मचाऱ्यांना आज दुसरे प्रशिक्षण देण्यात आले. सिडकोतील संत तुकाराम नाट्यगृहात हे प्रशिक्षण पार पडले.
मतदानाच्या दिवशी हे कर्मचारी विविध मतदान केंद्रांवर कर्तव्यावर राहणार आहेत. त्यामुळे या कर्मचाऱ्यांना त्या दिवशी मतदानाचा हक्क बजावणे शक्य होणार नाही. त्यामुळे या कर्मचाऱ्यांसाठी आज मतदानाची व्यवस्था करण्यात आली होती. ज्या कर्मचाऱ्यांनी तसे विनंती अर्ज केले होते, अशा जवळपास एक हजार कर्मचाऱ्यांना आज येथे मतदानासाठी मतपत्रिका उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. संबंधित मतदार ज्या मतदारसंघातील असेल, त्या मतदारसंघाची मतपत्रिका येथे उपलब्ध करून देण्यात आली होती. मतपत्रिकेवर मत नोंदविल्यानंतर या मतपत्रिका मतपेटीत बंद करून टाकण्यात येत होत्या. जिल्ह्यातील सर्व नऊही मतदारसंघांच्या मतपत्रिका येथे उपलब्ध होत्या.