अपंगाच्या पुढाकारातून मंठ्यात चालते गोशाळा
By Admin | Updated: February 9, 2015 00:43 IST2015-02-09T00:27:37+5:302015-02-09T00:43:22+5:30
पांडुरंग खराबे , मंठा जगदंबा देवी मंदीर परिसरात जय भद्रा मारोती देवस्थान येथे माता भगवती गोशाळामध्ये सुमारे ५० गायींचा सांभाळ केला जात आहे.

अपंगाच्या पुढाकारातून मंठ्यात चालते गोशाळा
पांडुरंग खराबे , मंठा
जगदंबा देवी मंदीर परिसरात जय भद्रा मारोती देवस्थान येथे माता भगवती गोशाळामध्ये सुमारे ५० गायींचा सांभाळ केला जात आहे. येथील अपंग तरूण महेश सराफ यांच्या पुढाकारातून हा कामधेनू प्रकल्प भव्य स्वरूपात साकारण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
अपघातात अपंगत्व आलेल्या महेश सराफने समाजकार्य करण्याचे ठरवले. उर्वरित जीवन केवळ गोमातेसाठी आणि समाजासाठी जगायचे, असा निर्धार महेशने केला. येथील सामाजिक कार्यकर्ते संतोष तिवारी अध्यक्ष असलेल्या भगवती गो शाळेसाठी व्यापारी महासंघाचे अध्यक्ष भारत बोराडे, रा.स्व.संघाचे राधाकृष्ण बोराडे यांनी मोठा संघर्ष करून सुमारे पावणेदोन एकर जमीन या गोशाळेसाठी उपलब्ध करून दिली.
अपंग असलेल्या महेश सराफने गोशाळेसाठी वेळोवेळी पुढाकार घेऊन मंडळाच्या सहकार्याने अनेक दुकानात गोशाळा दानपेट्या ठेवून निधी संकलित केला. सन २०१० मध्ये स्थापन केलेल्या या गोशाळेत आता सुमारे लहान मोठ्या ५० गायी आहेत. त्यासाठी ३० बाय ६० चे पत्राचे शेड उभारण्यात आले. गायीसाठी आणखी सोयीसुविधा वाढविण्याचा संस्थानचा प्रयत्न आहे. या ठिकाणी तात्पुरती पाणी, लाइट, चारा व्यवस्था करण्यात आली आहे.
भगवती गोशाळा सध्या जगदंबा देवी मंदिराजवळ जय भद्रा मारोती संस्थान परिसरात डोंगराळ भागावर आहे. ह.भ.प. महादेव महाराज जाधव, पापहरेश्वर संस्थान, मुरूमखेडा, ह.भ.प. स्वामी स्वरूपानंदजी सरस्वती, श्रीक्षेत्र पंचवरीधाम रोहिणा यांचे मार्गदर्शन लाभत आहे.