वाचकांसाठी खुशखबर! पुण्यानंतर ‘एनबीटी’ छत्रपती संभाजीनगरात भरविणारा पुस्तक महोत्सव
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2025 12:05 IST2025-08-13T12:04:38+5:302025-08-13T12:05:56+5:30
प्रकाशक आणि पुस्तकप्रेमींची मागणी लक्षात घेऊन दोन नव्या शहरांत पुस्तक प्रदर्शन भरविण्याबाबत प्रस्ताव दाखल

वाचकांसाठी खुशखबर! पुण्यानंतर ‘एनबीटी’ छत्रपती संभाजीनगरात भरविणारा पुस्तक महोत्सव
छत्रपती संभाजीनगर : नॅशनल बुक ट्रस्ट ऑफ इंडियातर्फे (एनबीटी) छत्रपती संभाजीनगर आणि नाशिक येथे लवकरच पुस्तक प्रदर्शन भरविण्याबाबत निर्णय घेण्यात येईल, असे प्रतिपादन एनबीटी ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. मिलिंद मराठे यांनी केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या ज्ञानस्त्रोत केंद्रातर्फे ‘लेखक आणि प्रकाशकांशी संवाद’ हा कार्यक्रम सोमवारी (दि. ११) सिपार्ट सभागृहात घेण्यात आला. अध्यक्षस्थानी प्र-कुलगुरू डॉ. वाल्मीक सरवदे होते. व्यासपीठावर कुलसचिव डॉ. प्रशांत अमृतकर, केंद्राच्या संचालक डॉ. वैशाली खापर्डे यांची उपस्थिती होती.
यावेळी डॉ. मराठे म्हणाले, ट्रस्टतर्फे मागील तीन वर्षांपासून पुण्यात पुस्तक प्रदर्शन भरविले जाते. हे प्रदर्शन यंदा नागपूर येथेही होणार आहे. परंतु, प्रकाशक आणि पुस्तकप्रेमींची मागणी लक्षात घेऊन दोन नव्या शहरांत पुस्तक प्रदर्शन भरविण्याबाबत संबंधित खात्याला प्रस्ताव पाठविला असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
अध्यक्षीय समारोपात प्र-कुलगुरू डॉ. सरवदे यांनी, नॅशनल बुक ट्रस्टचा पुस्तक विक्रीचा स्टॉल विद्यापीठात उभारण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे सांगितले. तसेच विद्यापीठातील दुर्मीळ ग्रंथांची जपणूक करण्यासाठी ट्रस्टने सहकार्य करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. डॉ. वैशाली खापर्डे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी झालेल्या चर्चासत्रात प्रकाशक, लेखकांच्या विविध प्रश्नांची उत्तरेही डॉ. मराठे यांनी दिली. डॉ. पराग हासे सूत्रसंचालन तर डॉ. सतीश पद्मे यांनी आभार मानले. कार्यक्रमाला विद्यापीठाच्या विविध प्राधिकरणांचे पदाधिकारी, अधिकारी उपस्थित होते.