गोंदेगाव परिसराला गारपिटीचा तडाखा
By Admin | Updated: August 22, 2014 00:57 IST2014-08-22T00:33:42+5:302014-08-22T00:57:31+5:30
जालना : जिल्ह्यात दडी मारलेल्या पावसाने बुधवारपासून पुनार्गमन केले. काही ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी तुरळक पाऊस झाला. जिल्ह्यात अंबड आणि मंठा तालुका वगळता सर्वत्र पाऊस झाला.

गोंदेगाव परिसराला गारपिटीचा तडाखा
जालना : जिल्ह्यात दडी मारलेल्या पावसाने बुधवारपासून पुनार्गमन केले. काही ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी तुरळक पाऊस झाला. जिल्ह्यात अंबड आणि मंठा तालुका वगळता सर्वत्र पाऊस झाला.जालना तालुक्यातील गोंदेगाव परिसरात गारपीट झाल्याने मोठे नुकसान झाले. जिल्ह्यात ४.९१ मि. मी पाऊस पडल्याची नोंद आहे.
जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. अद्यापपर्यंत दमदार पाऊस पडलेला नाही. गुरूवारी जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यात सर्वत्र जोरदार पाऊस पडला.तसेच काही ठिकाणी हलकासा पाऊस झाला. जालना तालुक्यात काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस पडला. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले.
जिल्ह्यात पडलेल्या पावसाची नोद जालना- ८ मि. मी. भोकरदन-१७.३८, जाफराबाद २ मि. मी, बदनापूर १.८०, अंबड ००, घनसावंगी ८.७१, मंठा ००, अशी एकून सरासरी ४.९१ मि. मी. पाऊस झाल्याची नोंद आहे. जिल्ह्यात आतापर्यंत फक्त १३०.२१ मि. मी पाऊस पडल्याची नोंद आहे. त्यात सर्वाधिक १९८ मि. मी. भोकरदन तालुक्यात तर सर्वात कमी मंठा तालुक्यात ६६.५ मि. मी. पाऊस पडल्याची नोंद आहे.
तीन महिन्यानंतर पाऊस
केदारखेडा: भोकरदन तालुक्यातील केदारखेडा परिसरात मागील तीन महिन्यांच्या विश्रांतीनंतर बुधवारी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे यावर्षी पहिल्यांदाच पूर्णा नदीला पाणी आले. पोळा सणाच्या तोंडावर पाऊस आल्याने शेतकरी आनंदीत झाले आहे.
केदारखेडा परिसरात दडीमारल्याने दुष्काळी परिस्थिती निर्माण झालेली आहे. शेतकऱ्यांची पिके मोठ्या प्रमाणात वाया गेलेली आहे. काही शेतकऱ्यांची पिके ठिबकच्या पाण्यावर जीवंत आहेत. अशा शेतकऱ्यांच्या पिकांना बुधवारच्या पावसाने जीवदान मिळाले आहे. परिसरातील शेतकरी अजूनही मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.
पहिल्यांदाच नदीला पाणी
केदारखेडा परिसरातून वाहणाऱ्या पूर्णा नदीला यावर्षी बुधवारी पडलेल्या पावसामुळे पहिल्यांदाच पाणी आले आहे. त्यामुळे नदीपात्रात असलेल्या पाणीपुरवठ्याच्या विहिरींची पाणी पातळी वाढण्याची शक्यता आहे. नदीपात्रात केदारखेडासह परिसरातील सुमारे २९ गावांच्या पाणी पुरवठ्याच्या सार्वजनिक विहीरी आहेत. (प्रतिनिधी)
जामवाडी: जालना तालुक्यातील गोंदेगाव शिवारात बुधवारी रात्री वादळी वाऱ्यांसह गारांचा पाऊस पडला. अचानक झालेल्या या गारपिटीमुळे शेडनेट हाऊस मधील काकडी, सिमला मिरचीचे आतोनात नुकसान झाले. शिवाजी वाघ या शेतकऱ्याने बिजोत्पादनासाठी तयार केलेल्या नेट हाऊस मधील फळ धारणेस आलेल्या पिकांचे सुमारे चार लाखांचे नुकसान झाले.
४काशिनाथ वाघ यांच्या मोसंबीचे आतोनात नुकसान झाले. तसेच कपासी व अन्य पिकांचे ही मोठे नुकसान झाले. कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अर्जुन खोतकर यांनी शुक्रवारी याची पाहणी केली. यावेळी उपजिल्हाप्रमुख पंडितराव भुतेकर, अनुराग कपूर, सुधाकर वाढेकर आदींची उपस्थिती होती. तसेच मंडळ अधिकारी ठोंबरे, तलाठी खोतकर यांनी पाहणी केली.
४चार महिन्यात तिसऱ्यांदा गारपीट - गोंदेगाव परिसरात गेल्या चार महिन्यात तिसऱ्यांदा गारपीट झाली. तीनही वेळेस शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झालेले आहे. शासनाने पंचनामे करण्याची मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.