घाटी रुग्णालयात एकच प्रवेशद्वार हवे; बेगमपुऱ्याकडील रस्ता बंद करण्याच्या हालचाली
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2024 15:40 IST2024-09-30T15:39:51+5:302024-09-30T15:40:15+5:30
विद्यार्थिनींसह महिला कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने एकच प्रवेशव्दार असावे; सुरक्षा ऑडिटमधून सूचना

घाटी रुग्णालयात एकच प्रवेशद्वार हवे; बेगमपुऱ्याकडील रस्ता बंद करण्याच्या हालचाली
छत्रपती संभाजीनगर : घाटी रुग्णालयात महिला डॉक्टर, वैद्यकीय विद्यार्थिनींसह महिला कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने एकच प्रवेशव्दार असावे, असे सुरक्षा ऑडिटमध्ये नमूद केले आहे. त्यामुळे रुग्णालय प्रशासनाने बेगमपुरा परिसरातून घाटीत येणारा रस्ता बंद करण्याची हालचाल सुरू केली आहे.
घाटीत यापूर्वी निवासी डाॅक्टर, विद्यार्थिनींच्या छेडछाडीच्या घटना घडल्या आहेत. रात्रीच्या वेळी नशेखोर, मद्यपींचा वावर वाढल्याची ओरड होते. निवासी डाॅक्टरांना मारहाणीच्या घटना घडत आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर घाटीत नुकतेच सुरक्षा ऑडिट करण्यात आले. त्यातून घाटीत सुरक्षारक्षकांची संख्या वाढविणे गरजेचे असल्याचे समोर आले. त्याबरोबरच घाटीत दोन प्रवेशद्वार आहेत. मात्र, सुरक्षेच्या दृष्टीने एकच प्रवेशद्वार असावे, असेही या ऑडिटमध्ये स्पष्ट केले आहे. त्यामुळे रुग्णालय प्रशासनाने आता बेगमपुऱ्याकडून घाटीत येणारा रस्ता रहदारीसह इतर वाहनांसाठी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
रुग्णवाहिकेचा विचार करू
महिला डॉक्टर, निवासी डॉक्टर, विद्यार्थी, कर्मचारी यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने एकच प्रवेशव्दार असावे, असा ऑडिट रिपोर्ट आहे. पोलिस प्रशासनानेही तशी सूचना केली आहे. त्यानुसार महिनाभरात मागील रस्ता बंद केला जाईल. रुग्णवाहिका येऊ शकेल, असे गेट करता येईल का? हे पाहिले जाईल.
- डॉ. शिवाजी सुक्रे, अधिष्ठाता