१८० एकर जमीन दिली मिळवून
By Admin | Updated: May 26, 2015 00:47 IST2015-05-26T00:17:44+5:302015-05-26T00:47:14+5:30
राहुल ओमने , शिराढोण दलित चळवळीतील ज्येष्ठ नेते एकनाथ आवाड यांनी उस्मानाबाद जिल्ह्यातील वंचित कष्टकऱ्यांसाठी मोठा लढा दिला.

१८० एकर जमीन दिली मिळवून
राहुल ओमने , शिराढोण
दलित चळवळीतील ज्येष्ठ नेते एकनाथ आवाड यांनी उस्मानाबाद जिल्ह्यातील वंचित कष्टकऱ्यांसाठी मोठा लढा दिला. त्यामुळेच जिल्ह्यातील गावकुसाबाहेरच्या अनेक वस्त्यात परिवर्तनाचे वारे वाहत आहे. शिराढोण येथील पारधी पेढीचा एकनाथ आवाडांनी कायापालट केला. आम्हाला माणुसकीचे हक्क मिळवून देतानाच पुढच्या पिढीलाही स्वावलंबनाचा मार्ग दाखवून दिल्याचे शिराढोण येथील पारधी पेढीतील कार्यकर्ती सुमन बारीक काळे यांनी सांगितले.
चळवळीत आक्रमक नेतृत्व असलेले एकनाथ आवाड यांचे हैद्राबाद येथे सोमवारी सकाळी उपचारादरम्यान निधन झाले. हे वृत्त समजताच जिल्ह्यातील कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांत शोकाकूल वातावरण पसरले. उस्मानाबाद जिल्ह्यातील काही तालुक्यात पारधी समाजाची संख्या मोठी आहे. माणुसकीच्या हक्कासाठी झगडणाऱ्या या समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आवाड यांनी मोठा लढा दिला. त्यामुळेच आवाडांच्या निधनाचे वृत्त कळताच सुमन काळे यांचा कंठ दाटून आला. शिराढोण परिसरात पारधी समाजातील आम्ही काहीजणांनी राहण्यासाठी झोपड्या उभारल्या होत्या. २००१ साली वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी कारवाई करीत या झोपड्या जाळल्या. ही माहिती एकनाथ आवाड यांना मिळाल्यानंतर ते तातडीने या वस्तीमध्ये दाखल झाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी हक्कासाठी कशा पद्धतीने संघर्ष केला हे त्यांनी सांगितले. त्यातून आम्हाला प्रेरणा मिळाली. घाबरु नका, हे आंदोलन आपणा सर्वांचे आहे. मी तुमच्या पाठीशी आहे, असा धिरही त्यांनी दिला. त्यानंतर कळंब तहसील तसेच जिल्हाधिकारी कार्यालयावर त्यांच्याच नेतृत्वाखाली आम्ही मोर्चा काढला. शासनाला या मोर्चाची दखल घ्यावी लागली. आणि त्यानंतर आम्हाला हक्काची जागा मिळाली. जागा उपलब्ध झाली. मात्र तेथे प्राथमिक सुविधा नव्हत्या. त्यासाठी सलग १४ वर्ष आवाडांनी पाठपुरावा केला. त्यांनीच आमची नावे मतदार यादीमध्ये टाकली. पिवळे रेशनकार्ड मिळवून दिले. त्यांच्यामुळेच आम्ही कायमचे रहिवाशी झालो. आज ही वस्ती जी काय आहे ती आवाड यांच्यामुळेच, असेही सुमन काळे ‘लोकमत’शी बोलताना म्हणाल्या.
‘जिजा’सोबत आम्ही उस्मानाबाद, औरंगाबाद इतकेच काय मुंबईतही अनेक मोर्चे काढले. त्यावेळी सर्वसामान्य कार्यकर्ते आणि त्यांच्या प्रश्नांविषयीची तळमळ मनाला स्पर्शूून जात होती. डॉ. आंबेडकरांची प्रेरणा व आवाड यांचे मार्गदर्शन त्यामुळेच आज १८० एकर गायरान जमीन आम्हाला मिळाली आहे. यातील एक हेक्टर जमिनीत आमची ४४ कुटुंबे राहतात. एक एकर जमीन शाळेसाठी तर प्रत्येक कुटुंबाला ४ एकर जमीन कसण्यासाठी मिळाली आहे. जमीन मिळाल्यानंतरही आवाडांनी पाठपुरावा कायम ठेवून ३५ घरकुले मंजूर करुन दिली. त्यातील पहिल्या टप्प्यात दहा घरकुलांची कामेही सुरु झाली आहेत. पंचायत समितीच्या माध्यमातून वस्तीवर कायमस्वरुपी पाण्याची सोय झाली असून, आमच्या मुलांसाठी ४ थी पर्यंतच्या शाळेची इमारत बांधून देण्यात आली. या वस्तीत आता वीजही पोहंचली असून, उपजिवीकेसाठी २२ म्हशी विविध योजनेतून मिळाल्या आहेत. या सर्व बाबी संघर्षामुळे मिळाल्या असून, हा संघर्ष आम्हाला एकनाथ आवाडांनी शिकविल्याचे सुमन काळे म्हणाल्या. एकेकाळी माणुसकीच्या हक्कापासून वंचित असलेल्या आमच्या समाजातील अनेक तरुणांनी आता चोरीसारखे प्रकार बंद केले असून, ही मुले गाई-गुरांचा सांभाळ करीत तसेच शेजारच्या शेतावर जावून आपली उपजिवीका भागवितात. एकनाथ आवाड यांच्यामुळेच हे शक्य झाल्याचे त्या म्हणाल्या.