स्वप्नातील घर मिळणार ! चिकलठाण्यात म्हाडाचा अल्पउत्पन्न गटासाठी ४०० घरांचा प्रकल्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2021 16:38 IST2021-11-15T16:37:10+5:302021-11-15T16:38:29+5:30
MHADA Homes in Auranagabad : म्हाडाकडून घर घेताना कोणतेही छुपे खर्च नसल्याने म्हाडाचा शहरात गृहप्रकल्प आहे, का याविषयी सतत विचारणा होत असते.

स्वप्नातील घर मिळणार ! चिकलठाण्यात म्हाडाचा अल्पउत्पन्न गटासाठी ४०० घरांचा प्रकल्प
- बापू सोळुंके
औरंगाबाद : महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ (म्हाडा) चिकलठाणा येथील विमानतळासमोर ४०० घरांचा भव्य प्रकल्प (MHADA Homes in Auranagabad ) बांधणार आहे. अल्पउत्पन्न गटासाठी असलेल्या या गृहप्रकल्पासाठी डिसेंबर महिन्यात पात्र व्यक्तींकडून अर्ज मागविण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे.
औरंगाबादेत घर आणि भूखंडांच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. पोटाला चिमटा देऊन आणि कर्ज काढून घेतलेले स्वस्त घर हे निर्विवाद, अधिकृत असेलच याची खात्री नसते. घरे किंवा प्लॉट घेतलेल्या अनेकांची फसवणूक झाल्याच्या घटना यापूर्वी घडलेल्या आहेत. या बिल्डरांना जेलमध्येही जावे लागले आहे. याउलट ‘म्हाडा’कडून खरेदी केलेले घर निर्विवाद असते. त्यामुळे सामान्य नागरिकांचा म्हाडाचे घर घेण्याकडेच कल असतो. १ नोव्हेंबर रोजी म्हाडाने सोडत पद्धतीने शहरातील १३५ नागरिकांना देवळाई, पडेगाव आणि भावसिंगपुरा येथे घरे मिळवून दिली होती. शासनाच्या नियमानुसार बिल्डरांनी ही घरे म्हाडाच्या ग्राहकांसाठी उपलब्ध केली होती.
म्हाडाकडून घर घेताना कोणतेही छुपे खर्च नसल्याने म्हाडाचा शहरात गृहप्रकल्प आहे, का याविषयी सतत विचारणा होत असते. ही बाब लक्षात घेऊन म्हाडा आता चिकलठाणा येथे सुमारे ४०० फ्लॅटचा गृहप्रकल्प उभारत असल्याची माहिती समोर आली. बहुमजली इमारतीत (अपार्टमेंट) या सदनिका असतील. २५ हजार ते ५० हजार रुपये मासिक उत्पन्न असलेल्या कुटुंबासाठी ही घरे असतील. या गृहप्रकल्पाचा अंतिम आराखडा मान्यतेसाठी बांधकाम विभागाकडे पाठविण्यात आला आहे. हा आराखडा मंजूर होताच पुढील महिन्यात यासाठी जाहिरात प्रकाशित होईल. या जाहिरातीनुसार घर घेण्यास इच्छुक असलेल्या पात्र व्यक्ती अर्ज करू शकणार आहेत.
प्रस्ताव तांत्रिक मंजुरीसाठी पाठवला
म्हाडाची घरे निर्विवाद असतात. यामुळे सामान्यांना परवडतील अशा दरात घरे उपलब्ध करण्यासाठी म्हाडा सतत प्रयत्नशील आहे. येथे मिळालेल्या जमिनीवर म्हाडा ४००हून अधिक सदनिकांचा गृहप्रकल्प उभारणार आहे. एलआयजी (अल्पउत्पन्न गट) ग्राहकांसाठी हा प्रकल्प आहे. याबाबतचा प्रस्ताव तांत्रिक मंजुरीसाठी बांधकाम विभागाकडे पाठविण्यात आला. बांधकाम विभागाकडून ही फाइल आल्यावर डिसेंबर महिन्यात यासंदर्भात जाहिरात प्रकाशित होईल.
- अण्णासाहेब शिंदे, मुख्याधिकारी, म्हाडा, औरंगाबाद