गायके यांचा कारमधून अपहरणाचा प्रयत्न, चौघांविरोधात गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2019 23:33 IST2019-02-25T23:32:29+5:302019-02-25T23:33:10+5:30
मॉर्निंग वॉकसाठी निघालेले अॅड. सदाशिव अंबादास गायके (७१) यांच्या डोक्याला रिव्हॉल्व्हर लावून त्यांना कारमधून पळवून नेण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची खळबळजनक घटना सोमवारी सकाळी ६.४५ वाजेच्या सुमारास कोकणवाडी येथे घडली. याप्रकरणी गायके यांच्या तक्रारीवरून वेदांतनगर पोलीस ठाण्यात चार अनोळखींविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला.

गायके यांचा कारमधून अपहरणाचा प्रयत्न, चौघांविरोधात गुन्हा
औरंगाबाद : मॉर्निंग वॉकसाठी निघालेले अॅड. सदाशिव अंबादास गायके (७१) यांच्या डोक्याला रिव्हॉल्व्हर लावून त्यांना कारमधून पळवून नेण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची खळबळजनक घटना सोमवारी सकाळी ६.४५ वाजेच्या सुमारास कोकणवाडी येथे घडली. याप्रकरणी गायके यांच्या तक्रारीवरून वेदांतनगर पोलीस ठाण्यात चार अनोळखींविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला.
वेदांतनगर पोलिसांनी सांगितले की, कोकणवाडी परिसरातील श्री कॉलनीमधील रहिवासी अॅड. सदाशिव गायके हे नेहमीप्रमाणे सोमवारी सकाळी ६.४० वाजेच्या सुमारास फिरायला गेले होते. कोकणवाडी येथील रस्त्याने जात असताना घोड्याच्या तबेल्याजवळ लाल रंगाच्या कारमधून उतरलेल्या चार जणांपैकी एकाने त्यांना घट्ट पकडले, तर दुसऱ्याने त्यांच्या डोक्याला रिव्हॉल्व्हर लावली आणि अन्य दोघांनी त्यांना बळजबरीने कारमध्ये कोंबण्याचा प्रयत्न केला. रिव्हॉल्व्हरधारी अॅड. गायके यांना म्हणाला की, सुरेश पाटील, नितीन पाटील आणि जयराम साळुंके यांच्याविरोधात तक्रार करतो का, तुला आज जिवंत सोडणार नाही. गायके यांनी आरडाओरड करीत प्रतिकार केल्याने परिसरातील एक महिला आणि जनार्दन तांबे, रमेश तांबे मदतीसाठी पळत आले. लोक येत असल्याचे पाहून अपहरणकर्ते कारमध्ये बसून पंचवटीच्या दिशेने पळून गेले. घटनेच्या वेळी रस्त्याच्या विरुद्ध बाजूला जयराम साळुंके व सुरेश दयाराम पाटील हे होते. या झटापटीनंतर ते निघून गेल्याचे गायके यांनी तक्रारीत नमूद केले. या तक्रारीवरून वेदांतनगर ठाण्यात अनोळखी चार आरोपींविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला. पोलीस निरीक्षक रामेश्वर रोडगे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक प्रवीण पाटील तपास करीत आहे.