गावरान लसूण ६०० रुपये किलो; फोडणीच्या आवाजाऐवजी डोक्यातच ‘तडतड’; भाव का वाढले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2024 13:00 IST2024-12-09T12:59:12+5:302024-12-09T13:00:02+5:30

छत्रपती संभाजीनगर : गावरान लसणाची झणझणीत फोडणी दिल्याशिवाय वरण खमंग होऊच शकत नाही. मात्र, सध्या गृहिणी फोडणी देताना दहा ...

Gawran garlic Rs 600 per kg; Instead of a cracking sound, there is a 'crack' in the head; Why did the prices increase? | गावरान लसूण ६०० रुपये किलो; फोडणीच्या आवाजाऐवजी डोक्यातच ‘तडतड’; भाव का वाढले?

गावरान लसूण ६०० रुपये किलो; फोडणीच्या आवाजाऐवजी डोक्यातच ‘तडतड’; भाव का वाढले?

छत्रपती संभाजीनगर : गावरान लसणाची झणझणीत फोडणी दिल्याशिवाय वरण खमंग होऊच शकत नाही. मात्र, सध्या गृहिणी फोडणी देताना दहा वेळा विचार करीत आहेत. कारणही तसेच आहे. किलोभर गावरान लसूण खरेदीसाठी ६०० रुपये मोजावे लागत आहेत. बाजारात लसूण चढ्या भावात विक्री होत असला तरी शेतकऱ्यांच्या खिशात यातील किती पैसे जातात, हा प्रश्न आहे.

फोडणीच्या आवाजाऐवजी डोक्यातच ‘तडतड’
भाजी असो, वरण असो, की चटणी; लसणाची फोडणी दिल्याशिवाय चव येतच नाही. फोडणी देत असताना खमंग वास दरवळून तडतड आवाज होतो. मात्र, गावरान लसूण ६०० रुपये किलो असून, हा भाव ऐकताच गृहिणींच्या डोक्यातच ‘तडतड’ होत आहे.

मध्य प्रदेशातून येतोय हायब्रीड लसूण
गावरान लसूण ६०० रुपये किलो विकला जात आहे. या लसणाची आवक पंचक्रोशीतून होत आहे; पण हायब्रीड लसणाची आवक थेट मध्य प्रदेशातून होत आहे. ४०० ते ५०० रुपये किलो दराने हा लसूण विकला जात आहे. मात्र, त्यास गावराण लसणाची चव नाही.

लसूण एवढा महाग का झाला?
दोन वर्षांपूर्वी गावरान लसूण ४० रुपये किलो, तर हायब्रीड लसूण २० रुपये किलो विकला जात होता. या मातीमोल भावामुळे लसूण उत्पादक राज्यातील शेतकऱ्यांनी लसणाच्या लागवडीकडे दुर्लक्ष केले. त्याचा परिणाम आता दिसू लागला आहे. उत्पादन घटल्याने लसणाचा भाव गगनाला भिडला आहे. भाव चांगला मिळत असल्याने शेतकरी लसणाची लागवड करत आहेत; पण जपूनच. कारण जास्त लागवड झाली तर उत्पादन वाढून भाव पुन्हा कोसळेल, अशी भीती शेतकऱ्यांच्या मनात आहे. नवीन लसणाची आवक फेब्रुवारीत सुरू होते. तोपर्यंत मात्र भाव टिकून राहील.
-संजय वाघमारे,भाजीपाला विक्रेते

लसूण खरेदीत आखडता हात
गावरान लसूण महाग असल्याने ग्राहकांनी पावशेर, छटाक लसूण खरेदी करणे सुरू केले आहे. दिवसभरात बोटांवर मोजण्याइतकेच ग्राहक अर्धा किलो लसूण खरेदी करतात. सहसा गावरान लसूणच खरेदी केला जातो.
-सागर पुंड, भाजीपाला विक्रेता

Web Title: Gawran garlic Rs 600 per kg; Instead of a cracking sound, there is a 'crack' in the head; Why did the prices increase?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.