गावठी हातभट्टी, बनावट देशी दारुचा कारखाना उद्धवस्थ; आरोपीचे बीड कनेक्शन उघड
By राम शिनगारे | Updated: March 3, 2023 19:13 IST2023-03-03T19:13:27+5:302023-03-03T19:13:43+5:30
विहामांडवा येथील घटना : ४०० लिटर रसायनासह साडेसहा लाखांचा मुद्देमाल जप्त

गावठी हातभट्टी, बनावट देशी दारुचा कारखाना उद्धवस्थ; आरोपीचे बीड कनेक्शन उघड
छत्रपती संभाजीनगर : होळी, धुलीवंदन सणासाठी विहामांडवा परिसरात बनविण्यात येत असलेली गावठी हातभट्टी, बनावट देशी दारूच्या कारखान्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने गुरुवारी छापा मारला. या छाप्यात पथकाने ४०० लिटर रसायनासह तब्बल ६ लाख ३२ हजार ५८८ रुपयांचा मुद्देमाल पकडला. यात कुख्यात योगेश दारासिंग गवळी (२८, रा. विहामांडवा, ता. पैठण) यास बेड्या ठोकल्याची माहिती 'ड' विभागाचे निरीक्षक शहाजी शिंदे यांनी दिली.
उत्पादन शुल्कच्या 'ड' विभागाचे दुय्यम निरीक्षक शिवराज वाघमारे यांच्या पथकास योगेश गवळी याच्या घरात गावठी हातभट्टीसह बनावट देशी दारु तयार करण्यात येत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार निरीक्षक शिंदे, दुय्यम निरीक्षक वाघमारे, सहायक दुय्यम निरीक्षक सुभाष गुंजाळे, जवान योगेश घुनावत, राहुल बनकर, आश्विनी बोदर व व्हि.जी. चव्हाण यांच्या पथकाने छापा मारला. तेव्हा गवळीच्या घरात बनावट देशी दारुसाठी १८० मिलिलिटरच्या २४० सिलबंद बाटल्या व तयार देशी दारूचे ब्लेंड, हातभट्टी दारू, दारू भरण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या काचेच्या रिकाम्या बाटल्या, देशी दारु भिंगरी संत्राच्या बाटल्यावर लावण्यात येणारे जिवंत बुचे सापडले. त्याशिवाय गुळमिश्रित सडवा रसायनापासून हातभट्टी दारू तयार करण्याकरिता लागणारे ४०० लिटर रसायनासह इतर साहित्य मिळाले. पथकाने हातभट्टीच्या दारूसह ६ लाख ३२ हजार ५८८ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणात गवळी याच्यासह त्याचा साथीदार नारायण घुमरे (रा. बीड) याच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला. गवळी यास बेड्या ठोकल्या असून, घुमरे फरार आहे. ही कारवाई अधीक्षक संतोष झगडे, उपअधीक्षक प्रदीप पोटे यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली.
आरोपीचे निघाले बीड कनेक्शन
हातभट्टी बनविणाऱ्या योगेश गवळी याची विहामांडवा परिसरात प्रचंड दहशत आहे. बनावट दारू तयार करण्यासाठी त्याला घुमरे हा बीडवरून स्पिरीट पाठवत होता. त्याशिवाय बनावट दारूची तिस्करीही गवळी करीत असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. आरोपीला न्यायालयात हजर केले असता, पोलिस कोठडी मंजुर करण्यात आली. अधिक तपास दुय्यम निरीक्षक शिवराज वाघमारे करीत आहेत.