गौताळा अभयारण्याची होतेय कचराकुंडी; क्विंटलभर प्लास्टिक अन् दारूच्या रिकाम्या बाटल्या जमा
By साहेबराव हिवराळे | Updated: October 6, 2022 15:04 IST2022-10-06T15:00:49+5:302022-10-06T15:04:58+5:30
हिवरखेडा व पूरणवाडी परिसरात जवळपास ४० कर्मचाऱ्यांनी कचरा गोळा केला.

गौताळा अभयारण्याची होतेय कचराकुंडी; क्विंटलभर प्लास्टिक अन् दारूच्या रिकाम्या बाटल्या जमा
औरंगाबाद : गौताळा अभयारण्यात शहरातील नागरिकांच्या सहली सर्रास सुरू आहेत. गांधी जयंती आणि वन्यजीव सप्ताहात वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी बुधवारी तेथे केरकचरा गोळा करताना त्यांचेही डोळे विस्फारले.
पर्यटनासाठी येणाऱ्यांकडून असा कचरा टाकला जातो. त्यामुळे ऑक्सिजन हबदेखील धोक्यात येण्याची भीती आहे. कोरोनाकाळात नागरिकांना ऑक्सिजन हब आणि वृक्षारोपणाची महती समजली; पण आता ते गांभीर्यच जणू हरवले आहे. सामाजिक विषयावर प्रबोधन करणाऱ्यांनीही याकडे लक्ष देण्याची गरज आहे.
हिवरखेडा व पूरणवाडी परिसरात जवळपास ४० कर्मचाऱ्यांनी कचरा गोळा केला. यावेळी वन परिक्षेत्र अधिकारी सागर ढोले, वनपाल प्रवीण पारखी, कांतीलाल रायसिंग, सुनील देशमुख आदींनी कचऱ्याच्या ८ ते १० गोण्या भरून जमा केल्या आहेत. हे श्रमदान बुधवारी दिवसभर करण्यात आले.
अनेकांवर दंडात्मक कारवाई...
पर्यटकांनी निसर्गाचा आनंद घेण्यासाठी यावे. प्लास्टिक कचरा, दारूच्या बाटल्या टाकणाऱ्यावर दंडात्मक कारवाई केली होती. त्याचा धसका पर्यटकांनी घेतला होता. पुन्हा तशीच कारवाई करणार आहोत.
- राजेंद्र नाळे, वन्यजीव विभाग अधिकारी
वन्यजीव सप्ताह गुपचूप करण्यात काय अर्थ?
वन्यजीव सप्ताह सुरू झाला असला तरी त्याचा गवगवा नेहमीसारखा यंदा झालेला नाही. खऱ्या अर्थाने निसर्ग आणि वन्यजीव यांच्याविषयीचे ज्ञान शाळकरी मुलांपासून ते ज्येष्ठांनाही कळले पाहिजे.
- डॉ. किशोर पाठक, मानद वन्यजीव सदस्य