"गॅस संपला, जीवनरक्षक औषधं कशी बनणार?"; छत्रपती संभाजीनगरमधील १० फार्मा कंपन्या बंद
By बापू सोळुंके | Updated: March 14, 2026 19:00 IST2026-03-14T18:55:14+5:302026-03-14T19:00:02+5:30
गॅसअभावी ७८ प्रकल्पांसमोर संकट, औषधांचा तुटवडा निर्माण होण्याची भीती, निर्यातीवरही परिणाम

"गॅस संपला, जीवनरक्षक औषधं कशी बनणार?"; छत्रपती संभाजीनगरमधील १० फार्मा कंपन्या बंद
छत्रपती संभाजीनगर : विविध औद्योगिक वसाहतीमध्ये जीवनरक्षक आणि अन्य औषधी बनवणाऱ्या एकूण ७८ कंपन्यांपैकी ५० टक्के कंपन्या लघू आणि मध्यम स्वरूपाच्या आहेत. या कंपन्यांना दैनंदिन वापरसाठी आवश्यक असलेला गॅस पुरवठा बंद झाल्याने आठ ते दहा कंपन्यांचे काम थांबले आहेत. शिवाय अन्य कंपन्यांकडील गॅसचा साठा दोन दिवसांत संपणार असल्याचे चित्र आहे. तेव्हा, शासनाने प्राधान्यांना औषधी कंपन्यांना गॅसचा पुरवठा करावा, अशी मागणी उद्योजकांकडून करण्यात आली आहे.
छत्रपती संभाजीनगरमधील विविध औद्योगिक वसाहतीमध्ये अजिंठा फार्मा, वोखार्ड, ग्लेनमार्क, सवेरा फार्मास्युटीकल, युनिफॉर्म ॲम्प्युअल्स ॲण्ड व्हायल प्रा.लि. यासह सुमारे ७८ औषधी कंपन्या कार्यरत आहेत. यातील ५० टक्के कंपन्या लघू श्रेणीतील आहेत. या कंपन्यांना औषध निर्मितीसाठी गॅसची गरज असते. येथील विविध मोठ्या आणि मध्यम, लघू कंपन्यांकडून अमेरिका, युएई, युके, बांग्लादेश, नेपाळ आणि दक्षिण अफ्रिका यांसह अन्य देशांना जीवनरक्षक आणि दैनंदिन गरजेची औषधी तसेच अन्य प्रकारच्या औषधींची निर्यात केली जाते. मोठ्या औषधी कंपन्यांचे बॉयलर हे ब्रिकेट, डिझेलवर आणि एलपीजी गॅसवर चालवितात. तर, लहान कंपन्यांत केवळ कमर्शियल एलपीजीचा वापर केला जातो.
आखाती देशातील युद्धांच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने कमर्शियल गॅसची बुकींग बंद करण्यात आली. केंद्र सरकारच्या या निर्णयाचा उद्योगांचा गॅस पुरवठा बंद झाला आहे. येथील एमआयडीसीमध्ये तीन कंपन्यांकडून इंजेक्शनचे औषध भरण्यासाठी लागणाऱ्या ॲम्प्युल्सची निर्मिती करण्यात येते. गॅस अभावी तीन कंपन्यांचे ॲम्प्युल्स उत्पादन थांबले आहेत. इंजेक्शनचे उत्पादन करणाऱ्या कंपन्यांच्या ॲम्प्युल्स पुरवठ्यावर याचा परिणाम झाला आहे. तर अन्य कंपन्यांकडून पुढील दोन, चार दिवस पुरेल एवढाच गॅसचा साठा आहे. या कंपन्यांना वेळेत गॅसचा पुरवठा न झाल्यास त्याही बंद पडतील, अशी माहिती औद्योगिक संघटनांनी दिली.
साठा संपला, उत्पादन थांबले
आपल्याकडील कंपन्यांकडून जगभरातील विविध देशांना, तसेच देशांतर्गत जीवनरक्षक औषधी, कॅन्सर, मधुमेह, हृदयविकाराचे रुग्ण, रक्तदाबाच्या रुग्णांना नियमित लागणारी औषधी, तसेच इंजेक्शन आणि टॉनिकची निर्मिती केली जाते. यात औषधी कंपन्यांपैकी निम्म्या कंपन्या एमएसएमई आहेत. त्यांच्याकडील गॅसचा साठा संपल्याने आठ ते दहा कंपन्यांचे उत्पादन थांबले आहेत.
-अर्पीत सावे, माजी अध्यक्ष सीएमआयए
औषधी कंपन्यांना प्राधान्याने गॅस द्या
औषधांना कोणताही पर्याय देता येत नाही. यामुळे औषधींची निर्मिती थांबणार नाही, याची काळजी घेण्यासाठी शासनाने तातडीने औषधी कंपन्यांना गॅसचा पुरवठा करणे गरजेचे आहे.
- वसंत वाघमारे, अध्यक्ष वाळूज इंडस्ट्रीज असोसिएशन
शासनाने गॅसचा पुरवठा करावा
आमची कंपनी काचेचे इंजेक्शन ॲम्प्युल्सची निर्मिती करते. हे ॲम्प्युल आम्ही देशांतर्गत तसेच बांगलादेश आणि नेपाळला पुरवठा करतो. आम्हाला प्रतिदिन १०० किलो गॅसची गरज असते. मात्र, गॅस अभावी आमचे उत्पादन मागील तीन दिवसांपासून थांबले. औषधांची गरज लक्षात घेता शासनाने आम्हाला गॅसचा पुरवठा करावा.
- नासेर शेख, संचालक युनिफार्मा ॲम्प्युल्स ॲण्ड व्हायल प्रा.लि.