कचऱ्याचा हायवा वळणावरही वेगात; दुचाकीला पाठीमागून धडक, विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू
By सुमित डोळे | Updated: October 3, 2023 20:11 IST2023-10-03T20:09:25+5:302023-10-03T20:11:46+5:30
धडकेमुळे पाठीमागील विद्यार्थी दूर फेकला गेल्याने बचावला, पण पायाला झाली गंभीर दुखापत

कचऱ्याचा हायवा वळणावरही वेगात; दुचाकीला पाठीमागून धडक, विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू
छत्रपती संभाजीनगर : महापालिकेच्या कचरा वाहतूक करणाऱ्या सुसाट हायवाच्या धडकेत हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण घेणाऱ्या उमेश विश्वास शिंदे (२०, रा. झाल्टा फाटा) याचा जागीच मृत्यू झाला. वळण घेतानाही चालकाने वेग कमी केला नाही. परिणामी, उमेशच्या मोपेड दुचाकीला हायवाची मागून धडक बसली. यात त्याचा मागे बसलेला मित्र ओमराजे लांब फेकला गेला तर उमेश मात्र थेट समोरच्या डाव्या चाकाच्या खाली आला. पोटावरुन चाक गेल्याने उमेशचा जागीच मृत्यू झाला. मंगळवारी दुपारी दिड वाजता समर्थनगरच्या सावरकर चौकात ही घटना घडली. झाल्टा फाटा येथील प्रसिध्द हॉटेल व्यवसायिकाचा उमेश एकुलता एक मुलगा होता.
उमेश एमजीएम महाविद्यालयात हॉटेल मॅनेजमेंटच्या पहिल्या वर्षाल शिक्षण घेत होता. मंगळवारी दुपारी मित्र ओमराजे सोबत तो दुपारी दीड वाजता नातेवाईकाला डब्बा देण्यासाठी निराला बाजारकडे निघाला. निराला बाजारकडे जात असताना त्याच्या मागे महापालिकेचा हायवा (एम एच २०- इ एल ००९४) जात होता. सावरकर चौकातील सिग्नल जवळून एमपी लॉ कॉलेजच्या दिशेने वळण घेत असतानाच सुसाट हायवाने उमेशला मागून धडक दिली. यात ओमराजे फेकला गेला तर उमेश हायवाच्या डाव्या बाजूच्या पुढील चाकाखाली सापडला.
स्थानिकांनी धाव घेत त्याला रुग्णालयात दाखल केले. मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. पोटाला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला होता. तर त्याच्या मित्राच्या पायाला गंभीर दुखापत झाली होती. अपघातानंतर हायवा सोडून चालक स्वत:हून क्रांतीचौक पोलिस ठाण्यात हजर झाला. रात्री उशीरापर्यंत याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू हाेती.