गंगापूर साखर कारखाना अपहारप्रकरणी तिघांचा जामीन फेटाळला
By | Updated: December 3, 2020 04:11 IST2020-12-03T04:11:05+5:302020-12-03T04:11:05+5:30
संपूर्ण गंगापूर तालुक्यातील ऊस उत्पादक कामगार, शेतकरी व नागरिकांचे लक्ष गंगापूर सहकारी साखर कारखान्यातील अपहारप्रकरणाकडे लागून राहिले आहे. गेल्या ...

गंगापूर साखर कारखाना अपहारप्रकरणी तिघांचा जामीन फेटाळला
संपूर्ण गंगापूर तालुक्यातील ऊस उत्पादक कामगार, शेतकरी व नागरिकांचे लक्ष गंगापूर सहकारी साखर कारखान्यातील अपहारप्रकरणाकडे लागून राहिले आहे. गेल्या ११ वर्षांपासून बंद असलेल्या या साखर कारखान्याचे चेअरमन आ. प्रशांत बंब व प्रभारी कार्यकारी संचालकांसह १६ जणांच्या विरोधात १५ कोटी ७५ लाख रुपयांच्या अपहार प्रकरणामध्ये गंगापूर पोलीस ठाण्यात १८ नोव्हेंबर रोजी गुन्हा दाखल झाला आहे. यातील ३ जणांनी वैजापूर येथील सत्र न्यायालयामध्ये जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. मंगळवारी यावर सुनावणी होऊन मनोरमा काबरा, विद्या मुनोत आणि पारस मुथा यांच्या वतीने न्यायालयात बाजू मांडताना सांगण्यात आले की, आम्ही इन्कमटॅक्स भरणारे आहोत. गंगापूर सहकारी साखर कारखान्याचे सभासद नाही. आम्ही संचालक मंडळाचा कुठलाही ठराव केलेला नाही, कारखान्याचे कुठलेही खाते उघडण्यासाठी आमच्या सह्या नाहीत. साखर कारखान्याने पेपरमध्ये केलेल्या आवाहनानुसार पारस मुथा यांनी ६२ लाख रुपये, विद्या मुनोत यांनी ४० लाख रुपये व मनोरमा काबरा यांनी ३० लाख रुपये कारखान्याला कर्ज म्हणून दिले होते. म्हणून त्याच्या व्याजासह एकास १ कोटी, दुसऱ्यास ७० लाख व तिसऱ्यास ५० लाख रुपये कारखान्याकडून परत दिल्याचे भासविण्यात आले. वास्तविक ही रक्कम आम्ही आमच्या बँकेत ठेवली असती, तर त्यापेक्षा जास्त मिळाली असती, आम्हाला मिळालेली रक्कम कारखान्याने ८ टक्के व्याजदराने दिली आहे. वरील पैसे कारखान्याने वेळेत न दिल्याने आम्ही कारखान्याला नोटिसादेखील दिल्या होत्या; परंतु चेअरमन आ. प्रशांत बंब यांनी ३१ डिसेंबरच्या आत तुमचे पैसे देतो, असे सांगितल्यानंतर आम्हाला वरील रकमा मिळाल्या आहेत. शिवाय मनोरमा काबरा यांच्या भावाचे ऑपरेशन असल्याच्या कारणावरून त्यांना जामीन देण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली होती.
चौकट
युक्तिवाद फेटाळला
मनोरमा काबरा, विद्या मुनोत आणि पारस मुथा या आरोपींच्या वकिलांनी न्यायालयात युक्तिवाद केला. मात्र, कारखान्याच्या अडकलेल्या मोठ्या रकमेचे गांभीर्य पाहता आरोपींच्या वकिलांचा युक्तिवाद अमान्य करून वैजापूर सत्र न्यायालयाने आरोपींचा अंतरिम जामीन फेटाळून लावला. या प्रकरणामध्ये सरकारी वकील म्हणून ॲड. नानासाहेब जगताप यांच्यासह कृष्णा पाटील डोणगावकर यांच्यावतीने मंगेश जाधव व कारखान्यातील कामगारांच्या वतीने ॲड. कृष्णा पाटील ठोंबरे यांनी बाजू मांडली.