गंगापुरात पुन्हा घरकुल घोटाळा?
By Admin | Updated: December 2, 2014 00:54 IST2014-12-02T00:54:05+5:302014-12-02T00:54:05+5:30
लालखाँ पठाण , गंगापूर तालुक्यातील दिनवाडा ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत सनव गावात बांधकामाची शहानिशा न करता घरकुलधारकास दोन धनादेश दिल्याने पुन्हा घरकुल घोटाळा समोर आला आहे

गंगापुरात पुन्हा घरकुल घोटाळा?
लालखाँ पठाण , गंगापूर
तालुक्यातील दिनवाडा ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत सनव गावात बांधकामाची शहानिशा न करता घरकुलधारकास दोन धनादेश दिल्याने पुन्हा घरकुल घोटाळा समोर आला आहे. चार वर्षांपूर्वी पंचायत समितीमध्ये घरकुल घोटाळा होऊन दहा जणांवर कारवाई झाली होती.त्यानंतर आता पुन्हा असाच प्रकार चव्हाट्यावर आल्याने खळबळ उडाली आहे.
२०१० मध्ये पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांच्यासह ११ अधिकारी, कर्मचाऱ्यांनी संगनमत करून करोडो रुपयांचा घरकूल घोटाळा केला होता. यात मयत झालेले, गाव सोडून गेलेले, अशा लोकांची नावे समाविष्ट करण्यात येऊन परस्पर कागदपत्रांचा जोडजमाव करून योजनेतील अनेक घरकुले लाटली व करोडो रुपयांचा शासनाला चुना लावला होता. ‘लोकमत’ने सर्वांत प्रथम ‘त्यांनी खाल्ले मयतांच्या टाळूवरचे लोणी’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित करून प्रकरण उजेडात आणले होते. या प्रकरणात त्यावेळी ५० लोकांचे साक्षी-पुरावे तपासण्यात येऊन गटविकास अधिकारी यांच्यासह ११ अधिकारी कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. या प्रकरणात सर्वांना जेलची हवा खावी लागली होती. या घरकुल घोटाळ्याला चार वर्षांचा कालावधी लोटला अहे.
आता पुन्हा पंचायत समितीमध्ये घोटाळा उघडकीस आला आहे. गंगापूर तालुक्यातील दिनवाडा ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत सनव गावात २०१३-१४ मध्ये इंदिरा आवास घरकुल योजनेतून मंजूर झालेली काही घरे त्याच कालावधीत बांधकाम करून पूर्ण करण्यात आली.
यातील एका घरकुल धारकाने अद्याप घरकुल बांधलेलेच नाही. याबाबत संबंधित विभागास विचारणा केली तर त्या ठिकाणी असलेल्या अधिकाऱ्याने सांगितले की, घर बांधण्याअगोदर अग्रीम धनादेश द्यावा लागतो. जर लाभधारक अत्यंत गरीब असेल तरच अग्रीम धनादेश दिल्यावर त्याने बेसमेंटपर्यंत काम करून त्याचे फोटो, ग्रामसेवक, सरपंच व संबंधित अभियंता यांचा अभिप्राय घेऊन दुसऱ्या धनादेशाची मागणी केल्यावरच सर्व बाबी पडताळून दुसरा धनादेश दिला जातो.
या ठिकाणी मात्र, अशा बाबींची वरवर तपासणी करून काम न करताच दोन धनादेश दिले आहेत. प्रत्यक्षात काम झाले नसताना दोन धनादेश देण्याचे धाडस दाखविणाऱ्या पदाधिकारी, ग्रामसेवक व
तांत्रिक अभियंता, तसेच लाभधारकांत काहीतरी गौडबंगाल झाल्याचे
दिसते, अशी तक्रार अनेकांनी केली आहे.
या घडलेल्या प्रकाराची माहिती नाही. मात्र याची तपासणी करून दोषी ग्रामसेवक आणि संबंधीत यंत्रणेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांची चौकशी करून त्यांच्याविरोधात कडक कारवाई करण्यात येईल, असे सभापती संजय जैस्वाल यांनी सांगितले. ४
या प्रकरणाची माहिती ‘लोकमत’ प्रतिनिधीपर्यंत पोहोचली असता प्रत्यक्ष सनव गावात जाऊन पाहणी केली. नमूद केलेल्या जागेवर घरकुलाचा मागमूस नसल्याचे दिसले. ४
‘लोकमत’ याबाबत भांडाफोड करणार व आपल्यावर कारवाई होणार, या भीतीपोटी संबंधितांनी तात्काळ लाभधारकास हाताशी धरून
दुसऱ्याच ठिकाणी थातूरमातूर काम सुरू केल्याचा देखावा निर्माण केला आहे.
गटविकास अधिकारी म्हणाले...नूतन गटविकास अधिकारी एन.एम. वाघ म्हणाले हा प्रकार चुकीचा असून त्याची चौकशी केली पाहिजे. यात जो दोषी असेल त्याच्यावर कारवाई केली जाईल.