छत्रपती संभाजीनगर : हॉटेलमध्ये झालेल्या किरकोळ वादातून तिघांच्या टोळक्याने दोघांना जबर मारहाण केली. एकाने तरुणावर पिस्तूल रोखत जिवे मारण्याची धमकी दिली. ही घटना शुक्रवारी रात्री आठच्या सुमारास जालना रोडवरील सिडकोजवळ हॉटेल कलिंगामध्ये घडली. या प्रकरणी रविवारी सिडको पाेलिसांनी गुन्हा नोंदवला आहे.
कार्तिक लोकल (रा. गारखेडा परिसर), कमलेश मुदिराज, जीवन कुरेवार अशी आरोपींची नावे आहेत. गुन्हा दाखल होताच सिडको पोलिसांच्या विशेष पथकाने तिन्ही आरोपींसह पिस्तूल ताब्यात घेतले. आशिष वसंतराव पवार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, शुक्रवारी रात्री ते हॉटेलमध्ये मित्र मनोज महाले यांच्यासोबत जेवण करण्यासाठी गेले. बाजूच्या टेबलवर तिन्ही आरोपी बसले होते. फोन आल्यामुळे बोलत आशिष पवार बाहेर गेले. ते परत आले तेव्हा आरोपी महाले यांना बेदम मारहाण करीत होते. कार्तिक लोकलने कमरेला लावलेले पिस्तूल काढून महाले यांच्या दिशेने रोखून धमकावले. आशिष पवार यांनी मारहाण करणाऱ्यांना विचारणा केली. तेव्हा त्यांनादेखील आरोपींनी मारहाण केली.
पिस्तूल काढून धमकावलेगुन्हा दाखल होताच सिडको पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक प्रमोद देवकते यांच्या पथकाने तिन्ही आरोपींना ताब्यात घेतले. पोलिसांनी पिस्तूल व सहा राऊंड जप्त केले. पिस्तूल नकली असले तरी ती एअरगन आहे. त्यात ‘राऊंड’ असून, ‘फायर’ केल्यानंतर मोठा आवाज होऊन जाळ निघतो. जवळून फायर केल्यानंतर त्यामुळे इजादेखील पोहोचू शकते, असे पोलिसांनी सांगितले.
भाईगिरी करण्याची हौसपाेलिसांच्या माहितीनुसार, आरोपी कार्तिक लोकलला नेतेगिरी करण्याचा भारी शौक आहे. कमरेला नकली पिस्तूल लावून अंगात पांढरे कपडे घालून तो टोळक्यासोबत फिरत असतो.