पाथरी आगारात विद्यार्थिनींची गांधीगिरी
By Admin | Updated: July 12, 2014 01:12 IST2014-07-12T00:30:49+5:302014-07-12T01:12:13+5:30
पाथरी : मानव विकास कार्यक्रमांतर्गत ग्रामीण भागातील मुलींना शिक्षणासाठी प्रत्येक तालुकास्तरावर राज्य शासनाने पाच बसेस उपलब्ध करून दिल्या असल्या तरी शाळेत येणाऱ्या विद्यार्थिनींना बसच मिळत नाहीत.
पाथरी आगारात विद्यार्थिनींची गांधीगिरी
पाथरी : मानव विकास कार्यक्रमांतर्गत ग्रामीण भागातील मुलींना शिक्षणासाठी प्रत्येक तालुकास्तरावर राज्य शासनाने पाच बसेस उपलब्ध करून दिल्या असल्या तरी शाळेत येणाऱ्या विद्यार्थिनींना बसच मिळत नाहीत. ११ जुलै रोजी सकाळी १० च्या सुमारास खेर्डा पाटीवर मुली बसमध्ये प्रवास करण्यासाठी उभ्या असतानाही चालकाने बस न थांबविल्याने अखेर या मुलींनी पाथरी आगार व्यवस्थापकाची भेट घेऊन त्यांचा सत्कार करून गांधीगिरी केली.
मागील तीन वर्षांपासून राज्य शासनाकडून ग्रामीण भागातील मुलींना शहरामध्ये शिक्षणासाठी येण्यासाठी सोय व्हावी म्हणून बसेस उपलब्ध करून देण्याची योजना सुरू केली. प्रत्येक तालुकास्तरावर ग्रामीण भागाचे मार्ग ठरवून देऊन मानव विकासाच्या बसचा आराखडा तयार करण्यात येतो.
शाळा सुरू होऊन एक महिन्याचा कालावधी उलटला आहे. परंतु ग्रामीण भागातून शहरात शिक्षणासाठी येणाऱ्या मुलींना प्रवास करताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. यावर कोणी नियंत्रण ठेवायचे? हा गहण प्रश्न आहे. आगाराचे कर्मचारी मनमानी करतात, शिक्षण विभागाला याकडे लक्ष देण्यास वेळ नाही, पंचायत समितीचे सोयरसूतक नाही आणि शाळेची काही जबाबदारी नाही म्हणून याबाबत कोणीच जबाबदारी घेण्यास तयार नाही. ११ जुलै रोजी पाथरी आगाराची नाथरा-पाथरी ही बस खेर्डामार्गे पाथरीकडे येत होती. खेर्डा पाटीवर या बसची वाट पाहत अनेक विद्यार्थिनी थांबल्या होत्या. परंतु चालकाने या पाटीवर बसच उभी केली नाही. गावातील ग्रा. पं. सदस्य सुरेश आमले आणि विकास वायेळ यांनी या बसचा पाठलाग करून बस पुन्हा खेर्डा पाटीवर परत आणली. याबसमध्ये बसून या विद्यार्थिनींना थेट आगार व्यवस्थापकाकडे नेण्यात आले. (वार्ताहर)
शाळेसाठी विद्यार्थिनी रस्त्यावर
दररोज शाळेत येण्यासाठी उशिर होत आहे. मानव विकासच्या बस पाटीवर थांबविल्या जात नाही. शासनाचा या योजनेचा लाभच होत नसल्याने या बसमधील संगीता सिताफळे, जना लांडगे, यशोदा सिताफळे, राधा सिताफळे, शिल्पा भाग्यवंत, साक्षी आमले, भालके यांनी डेपो मॅनेजर मोेरे यांचा हार घालून गांधीगिरीने सत्कार केला. तसेच यावेळी सदाशिव थोरात, राहूल ढगे, के.प् ाी. पांढरे, बालासाहेब डख, जम्मू खान पठाण यांंनी डेपो मॅनेजरसोबत चर्चा करून बससेवा सुरळीत करण्याची मागणी केली.
पाथरी तालुक्यातील खेर्डा पाटीवर मानव विकासची बस थांबत नसल्यामुळे विद्यार्थिनींनी आगार व्यवस्थापकास हार घालून गांधीगिरी करून आपल्या व्यथा मांडल्या.