खर्चातही गायकवाडांचीच आघाडी
By Admin | Updated: July 27, 2014 01:14 IST2014-07-27T00:33:34+5:302014-07-27T01:14:35+5:30
उस्मानाबाद : लोकसभा निवडणुकीच्या रिंगणामध्ये थोडे थोडके नव्हे, तर तब्बल २७ जणांनी नशीब अजमावले. मात्र, शिवसेनेचे उमेदवार प्रा. रवींद्र गायकवाड हे निवडणूक आखाड्यात सर्वांनाच वरचढ ठरले.
खर्चातही गायकवाडांचीच आघाडी
उस्मानाबाद : लोकसभा निवडणुकीच्या रिंगणामध्ये थोडे थोडके नव्हे, तर तब्बल २७ जणांनी नशीब अजमावले. मात्र, शिवसेनेचे उमेदवार प्रा. रवींद्र गायकवाड हे निवडणूक आखाड्यात सर्वांनाच वरचढ ठरले. त्यामुळे खासदारकीची माळही त्यांच्याच गळ्यात पडली. विशेष म्हणजे निवडणुकीवर खर्च करण्यातही तेच आघाडीवर आहेत. त्यांना पक्षाकडून ७ लाख ६ हजार ८७६ रुपये इतका निधी देण्यात आला होता. प्रत्यक्षात त्यांनी ४५ लाख ४६ हजार ५७४ रूपये खर्च केले आहेत. दुसऱ्या स्थानावर राष्ट्रवादी काँग्रेसचे डॉ. पद्मसिंह पाटील आहेत. त्यांनी ४१ लाख ६० हजार २४५ रुपये खर्च केल्याचे निवडणूक विभागाला सादर केलेल्या अहवालात म्हटले आहे.
विविध पक्ष आणि अपक्ष मिळून सुमारे २७ जण निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. परंतु, खरी लढत ही राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्यामध्येच पहावयास मिळाली. शिवसेनेचे उमेदवार प्रा. रविंद्र गायकवाड यांना पक्ष निधी म्हणून ७ लाख ६ हजार ८७६ रुपये देण्यात आले होते. प्रत्यक्ष खर्च चार ते पाच पटीने अधिक झाला. त्यांनी निवडणुकीमध्ये ४५ लाख ४६ हजार ५७४ रूपये खर्च केल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. डॉ. पद्मसिंह पाटील यांना पक्षाने सर्वाधिक ५० लाख रूपये दिले होते. मात्र, त्यांचे निवडणूक काळामध्ये प्रचारावर ४१ लाख ६० हजार २४५ रूपये खर्च झाले आहेत. त्यानंतर दुसऱ्या स्थानावर बहुजन समाज पार्टीचे पद्मशील ढाले हे राहिले आहेत. त्यांचेही सुमारे १८ लाख ८५ हजार ३३१ रूपये खर्च झाले आहेत.
दरम्यान, रोहन देशमुख यांच्या अपक्ष उमेदवारीनेही निवडणूक आखाड्यात रंगत निर्माण केली होती. त्यांनीही ताकद लावली होती. त्यानुसार देशमुख यांचा १६ लाख ८५ हजार ७८८ रूपये खर्च झाला आहे. आम आदमी पार्टीचे उमेदवार विक्रम अशोक साळवे यांनीही १४ लाख २१ हजार ५९५ रूपये खर्च झाल्याचे नमूद केले आहे. उर्वरित पक्षाच्या व अपक्ष उमेदवारांचा खर्च मात्र, चार ते पाच लाखाच्या आतच असल्याचे प्राप्त आकडेवारीवरून दिसते. (प्रतिनिधी)
अपक्षही खर्चात राहिले नाहीत मागे
अलताफ हुसेन येणेगुरे यांचा २७ हजार ७००, उज्ज्वला एकनाथ जाधव ३२ हजार २००, काकासाहेब राठोड २५ हजार ९२४, उमाजी गायकवाड २६ हजार ५५०, सय्यद महमंद सय्यद ६५ हजार ३०८, अॅड. शैलेंद्र रामेश्वर यावलकर १ लाख २० हजार ६०० रूपये, रवींद्र गायकवाड ३२ हजार ४००, तुकाराम दासू गंगावणे ३४ हजार ५४२, बालाजी बापूराव तुपसुंदरे १५ हजार ३७९, नवनाथ दशरथ उपळेकर २४ हजार ८५०, पद्मसिंह विजयसिंह मुंडे-पाटील २५ हजार ११०, पाटील मनोहर आनंदराव २५ हजार ४९०, शेख मुबारक मैनोद्दीन ५० हजार ९८०, क्षीरसागर विजय मारूती १ लाख ५५ हजार ४३८, क्षीरसागर शिवाजी जगन्नाथ ४७ हजार ६७०, सुशिलकुमार विनायक पाडुळे २७ हजार ५००, तरकसे पुष्पाताई मुरलीधरराव १ लाख २ हजार ७७१, डॉ. रमेश सुब्राव बनसोडे १४ हजार ५४०, शिंदे राजेंद्र भैरवनाथ यांचा १५ हजार ५०० रूपये, जनता दलाचे (से.) रेवन भोसले यांचा ३ लाख १८ हजार १७० रूपये खर्च झाल्याचे अंतिम अहवालत नमूद करण्यात आले आहे.
चौघांनाच मिळाला पक्षनिधी
लोकसभा निवडणुकीच्या रिंगणामध्ये विविध पक्षांसोबतच अपक्षही उतरले होते. परंतु, चार जणांनाच पक्ष निधी मिळू शकला. यामध्ये शिवेसेनेचे खासदार प्रा.रवींंद्र गायकवाड, राष्ट्रवादीचे डॉ. पद्मसिंह पाटील, रेवन भोसले आणि बहुजन मुक्ती पार्टीचे सय्यद महमंद सय्यद या चार जणांचाच समावेश आहे.