‘पैसे द्या प्रमाणपत्र घ्या’ चा फंडा
By Admin | Updated: July 11, 2014 00:57 IST2014-07-10T23:38:32+5:302014-07-11T00:57:58+5:30
बीड: शासकीय सेवेत समाविष्ट होण्यासाठी अत्यावश्यक असलेले वैद्यकीय तपासणी प्रमाणपत्र जिल्हा रुग्णालयातून मिळण्यासाठी विलंब लागत आहे.

‘पैसे द्या प्रमाणपत्र घ्या’ चा फंडा
बीड: शासकीय सेवेत समाविष्ट होण्यासाठी अत्यावश्यक असलेले वैद्यकीय तपासणी प्रमाणपत्र जिल्हा रुग्णालयातून मिळण्यासाठी विलंब लागल असल्याने विविध शासकीय कार्यालयात रुजू होऊ इच्छिणाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागले आहे. विशेष म्हणजे, गेल्या आठ दिवसापासून शिक्षक व इतर कार्यालयात रुजू होणारे कर्मचारी जिल्हा रुग्णालयात येत आहेत. मात्र त्यांना दर दिवशी रिकाम्या हातानेच परतावे लागत आहे.
राज्य शासनाने वस्ती शाळा शिक्षकांच्या नियुक्तीसाठी ग्रीन सिग्नल दिला असल्याने त्यांची नियुक्ती करण्यात येत आहे. ही भरती २००१ ची असल्याचे समजते. शिक्षकांसह पोलीस विभागाच्या वतीने नुकतेच घेतलेल्या भरतीमध्ये लेखी परीक्षेतून निवडण्यात आलेले उमेदवार सेवेत समाविष्ट होण्यासाठी जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय प्रमाणपत्र घेण्यासाठी येत आहेत मात्र त्यांना प्रत्येक दिवशी परत पाठविले जात आहे. वैद्यकीय प्रमाणपत्र मिळत नसल्याने हे प्रमाणपत्र मिळविण्यासाठी जिल्हा रुग्णालयात गर्दी वाढतच चालली आहे.
जिल्हा शल्य चिकित्सक अडवणूक करीत असल्याचा आरोप
जिल्हा शल्य चिकित्सक अशोक बोल्डे हे जाणुनबजून वैद्यकीय प्रमाणपत्र मिळविण्यासाठी गरजु लोकांची अडवणूक करीत असल्याचा आरोप करीत आहे. जिल्हा रुग्णालयात ‘लोकमत’शी प्रतिक्रिया देताना नाव न घेण्याच्या अटीवरुन एका महिलेने सांगितले की, जिल्हा शल्य चिकित्सक बोल्डे हे मुद्दामहून वैद्यकीय प्रमाणपत्र देण्यास विलंब करीत आहेत. त्यामुळे आम्हाला प्रशासकीय कामामध्ये असंख्य अडचणींना समोर जावे लागत आहे. दरम्यान, जिल्हा रुग्णालयातून वैद्यकीय प्रमाणपत्र मिळविण्यासाठी बाहेर गावाहून नागरिक बीड शहरात येत आहेत मात्र आठ-आठ दिवस प्रमाणपत्र मिळत नसल्याने गर्दीचा ओघ वाढत चालल आहे.
पन्नासहून अधिक लोकांची गर्दी
बीड शहरातील जिल्हा शल्य चिकित्सकांच्या केबिनबाहेर जवळपास पन्नास लोकांनी वैद्यकीय प्रमाणपत्र मिळविण्यासाठी गर्दी केली होती. अर्ज केलेल्या उमेदवारांची नावे घेऊन त्यांची तपासणी केली जात होती. एका उमेदवारास जवळपास दहा ते पंधरा मिनिटांचा कालावधी लागत असल्याने गर्दी दुपारी दीड वाजेपर्यंत कायमच होती. तपासणी लवकर होत नसल्याने अनेकजण जिल्हा रुग्णालयात ताटकळत बसले होते.
नेमका का होतोय विलंब ?
शासकीय सेवेत समाविष्ट होणाऱ्या कर्मचाऱ्यांना वैद्यकीय प्रमाणपत्र देणे बंधनकारक आहे. हे प्रमाणपत्र मिळण्यासाठी अर्जदारास अर्ज करायचा असतो. हा अर्ज मिळाल्यानंतर वैद्यकीय अधिकारी तपासणी करुन तात्काळ वैद्यकीय प्रमाणपत्र देतात. मात्र जिल्हा रुग्णालय हे प्रमाणपत्र देण्यासाठी उशीर का लागतोय हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे. या संदर्भात प्रतिक्रिया घेण्यासाठी जिल्हा शल्य चिकित्सक अशोक बोल्डे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न मोबाईलवरुन केला मात्र त्यांचा मोबाईल कव्हरेजच्या बाहेर होता. (प्रतिनिधी)
ही तर शिक्षकांचीही पिळवणूक
डॉ. अशोक बोल्डे हे शिक्षकांची जाणून-बुजून अडचण निर्माण करीत आहे. वैद्यकीय प्रमाणपत्र देण्यासाठी कमी कालावधी लागतो. मात्र डॉ. बोल्डे हे मुद्दामहून शिक्षकांची अडवणूक करीत आहेत. ही शिक्षक व इतर कर्मचाऱ्यांची पिळवणूक असल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष शैलेश जाधव यांनी केला आहे.